पैशाच्या लोभाने मित्राचा खून केल्याप्रकरणी दोन मित्रांना जन्मठेप

रोहा: रोह्यात दोन वर्षांपुर्वी पैशाच्या लोभाने मित्राचा खून केल्याप्रकरणी दोन मित्रांना आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना रोहा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे उंबराचा पाणी नावाचे जंगल भागात रोहा तांबडी रोडलगत गोरीजवळ सप्टेंबर २०१८ ला घडलेली आहे.
या घटनेची हकीकत अशी की, यातील आरोपी एक सतिश उर्फ बाबा संजय मोरे व सुनिल अंकुश कांबळे यांनी संगनमत करून फिर्यादी संदीप मोरे यांचा मुलगा जागृत  मोरे यांच्या तोंडावर कोणत्यातरी हत्याराने गंभीर दुखापती करून जीवे ठार मारून पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने प्रेत रोहा तांबडी रोड लगत असलेल्या मोरीच्या पाईपात लपून ठेवला. हा गुन्हा फिर्यादी याने रोहा पोलीस ठाणे येथे दाखल केला.

हा गुन्हा दाखल झाल्यानंतर या गुन्ह्यातील आरोपी एक सतिश उर्फ बाबा संजय मोरे व दुसरा आरोपी सुनिल अंकुश कांबळे या आरोपींना रोहा पोलीस ठाणे यांनी जेरबंद केले. या गुन्ह्याचा तपास रोहा पोलीस निरीक्षक अजीमुद्दीन. आय.मुल्ला यांनी केला सतिश उर्फ बाबा संजय बाबा मोरे व सुनिल अंकुश कांबळे यांस भा.दं.वि. कलम ३०२, ३९७, २०१, ४११, ३४ प्रमाणे गुन्हा केल्याचा दोषारोप ठेवण्यात आला. आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले.या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालय माणगाव – रायगड येथे झाली. त्यावेळी अति. सहजिल्हा न्यायाधीश तथा माणगाव अति सत्र न्यायाधीश जहांगीरदार  यांनी या प्रकरणात सर्व आरोपींना आज दोषी धरून भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्म ठेपेची शिक्षा व प्रत्येकी पन्नास हजार दंड तसेच भा.दं.वि.कलम ३९७ अन्वये सात वर्षे सक्त मजुरीची शिक्षा व  कलम २०१ अन्वेये तीन वर्षे शिक्षा व प्रत्येकी १०००० दंडाची शिक्षा सुनावली. ही माहिती सहाय्यक सरकारी अभियोक्ता अॅड. जितेंद्र म्हात्रे यांनी दिली.