पनवेल उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर वाढविण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

पनवेल : कोविड रूग्णांना दिवसेंदिवस ऑक्सिजन, व्हेंटिलेटर(ventilator) बेडची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी पनवेल उपजिल्हा रूग्णालयात आणखी दहा व्हेंटिलेटर वाढविण्याचे निर्देश तसेच खासगी रुग्णालयांना लागणारा ऑक्सिजन पुरवठा देण्यासोबत आणखी काही रुग्णालयांना कोविड दर्जाची परवानगी देण्याचे निर्देश पालकमंत्री आदिती तटकरे(aditi tatkare) यांनी मंगळवारी पनवेल(panvel) महापालिका आयुक्तांना दिले. खासगी डॉक्टर पुरेसा पगार देवून किंवा जाहिराती देवूनही प्रतिसाद देत नसल्याची खंत यावेळी आयुक्तांनी व्यक्त केली
पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला ऑनलाईन बैठक(online meeting) १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्याचे आदेश दिले होते.  यावेळी या ऑनलाईन बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल महापालिका आयुक्त सुधाकरराव देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, पनवेल महापालिका उपायुक्त संजय शिंदे, प्रांताधिकारी दत्तात्रेय नवले, डॉ. गिरीश गुणे आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू सहभागी झाले होते.
पीएम केअर फंडातून आलेल्या २० व्हेंटिलेटरपैकी १० व्हेंटिलेटर डी. वाय. पाटील रूग्णालयास देण्यात आले आहेत. उर्वरित १० व्हेंटिलेटर उपजिल्हा रूग्णालयात कार्यान्वित करण्यात यावेत, अशी कांतीलाल कडू यांची मागणी होती. त्या अनुषंगाने पालकमंत्री आदिती तटकरे यांनी हे व्हेंटिलेटर उपजिल्हा रूग्णालयात कार्यान्वित करण्यात यावेत, त्यासाठी लागणारा आवश्यक निधी तात्काळ देण्यात येईल,असे सांगितले. खासगी डॉक्टर पुरेसा पगार देवून किंवा जाहिराती देवूनही प्रतिसाद देत नसल्याची खंत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी व्यक्त केली. डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने अतिदक्षता विभाग चालविणे दिवसेंदिवस अवघड होत असल्याबाबतची वस्तुस्थिती त्यांनी पालकमंत्री तटकरे यांच्याकडे मांडली. शिवाय खासगी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली म्हणून स्वास्थ हॉस्प‍िटलने महापालिकेविरुध्द न्यायालयात दावा दाखल केला असून या रुग्णालयाने महापालिकेकडे दरमहा ५ कोटी रूपये नुकसान भरपाई मागितली असल्याची माहिती त्यांनी यावेळी पालकमंत्रीआदिती तटकरे यांना दिली.

अतिदक्षता विभागामध्ये काम करण्यासाठी खासगी डॉक्टरांना शासनाच्या नियमानुसार वेतन दिले जाते. त्यामुळे शासन नियमांच्या पलिकडे जाऊन त्या डॉक्टरांना जास्त वेतन देणे शक्य नसल्याचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले. त्यावर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शहरांच्या दृष्टीने विचार करता अलिबाग किंवा पनवेल अशी तुलना करणे उचित ठरणार नाही, असे सांगून पनवेलच्या शेजारी नवी मुंबई, मुंबई आणि ठाणे अशी मोठी शहरे असल्याने पनवेलच्या डॉक्टरांचीही पगाराची अपेक्षा जास्त असू शकते, असे मत व्यक्त केले.

कोणत्याही परिस्थितीत पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आणखी दहा व्हेंटिलेटर वाढवून घ्यायचे आहेत. त्याशिवाय भविष्यातील परिस्थितीचा विचार करुन करोनाचा मुकाबला करताना आणखी काही खासगी रुग्णालयांशी संपर्क साधून अथवा त्यांचे प्रस्ताव आल्यास तातडीने त्यांना कोविड रूग्णांसाठी परवानगी देण्यात यावी, असे आदेश पालकमंत्री तटकरे यांनी आयुक्त देशमुख यांना दिले. त्याशिवाय दोन दिवसात बैठक बोलावून यावर मार्ग काढण्याचेही सूचित केले.