sunil tatkare mhasala video conferencing

म्हसळा :  म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालय सुरु झाल्याला अनेक वर्षे झाली. मात्र ग्रामीण रुग्णालयातील मंजूर कर्मचारी वर्ग पुरविण्यास आणि ग्रामीण रुग्णालयास आवश्यक असणारी यंत्रसामुग्री व आवश्यक फर्निचर पुरविण्यास शासन अपयशी ठरल्याने म्हसळा तालुका पत्रकार संघातर्फे आवाज उठविण्यात आला आहे. त्यासाठी खासदार सुनिल तटकरे, राज्यमंत्री तथा पालकमंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे यांची काही दिवसांपूर्वी प्रत्यक्ष भेट घेऊन तालुक्याच्या आरोग्य विषयक बाबींकडे लक्ष वेधून त्यांना निवेदन देण्यात आले.

खासदार सुनिल तटकरे यांनी त्वरित राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संपर्क साधून म्हसळा तहसीलदार यांच्या दालनात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचे आयोजन केले. तालुक्यातील आरोग्य विषयावर सविस्तर चर्चा घडवून आणली. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये आरोग्य संचालकांसह आरोग्य सचिव, खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटिल, श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे, ग्रामीण रुग्णालय प्र. अधीक्षक डॉ.ढवळे, तहसिलदार शरद गोसावी, वैद्यकिय अधिकारी डॉ.महेश मेहता तालुक्यातील पत्रकार आदी मान्यवर उपस्थित होते.

त्याचप्रमाणे एप्रिल २०२० दरम्यान राज्यांत, जिल्ह्यात व तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आसतानाच प्रत्येक तालुका मुख्यालयाचे ठिकाणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या निर्देशानुसार व पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने म्हसळा तालुक्यासाठी आगरवाडा येथील आय.टी.आय. इमारतीत लवकरच ४० खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले.

म्हसळा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक वर्ग-१ रिक्त पद, वैद्यकीय अधिकारी वर्ग-२ रिक्त पदे-३, अधिपरिचारिका वर्ग-३ रिक्त पद-१, प्रयोगशाळा सहाय्यक वर्ग-३ रिक्त पद-१, क्ष किरण तंत्रज्ञ वर्ग-३ रिक्त पद-१, कक्षसेवक वर्ग-४ रिक्त पदे-३ अशा प्रकारे कर्मचारी पदे रिक्त असून ग्रामिण रुग्णालयासाठी लागणारे यंत्र सामुग्री आणि आवश्यक फर्निचर त्वरित मिळावीत अशी मागणी खासदार सुनिल तटकरे यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे  केली आहे.