रोह्यामध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाची जोरदार हजेरी

रोहा: रोहा(roha) तालुका गेले आठ दहा दिवस उकाड्याने हैराण झाले होते. अशातच शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास विजांच्या कडकडासह पावासाने(rain) रोहा शहरासह जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बाजारात आलेल्यांची व व्यापाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.  रोहा शहरात पाणीच पाणी झाले होते. एक दोन तासांपुरती नागरिकांची तारांबळ उडाली होती. त्याचप्रमाणे रोहा शहरासह ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडीत झाला होता. आज सायंकाळ पर्यंत ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप झाला आहे.
निसर्ग चक्रीवादळानंतर ग्रामीण भागात पंधरा दिवसानंतर वीजपुरवठा हळूहळू सुरळीत होत जात असतानाच आता पुन्हा एकदा विजांच्या चमकण्याने व गरजणाऱ्या ढगांमुळे अचानक वीज गायब झाल्याने नागरीक हैराण झाले आहेत. तर पुन्हा एकादा ग्रामीण भागातील रात्र अंधारात राहिली आहे. या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहे. आता कुठेतरी भातपिक फुलत असतानाच पावसाचा मारा भातशेतीवर झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे.
रोहा शहराला लागून असलेल्या कलसगिरीच्या उंच डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने रोहा शहरातील दमखाडी, कोर्ट रोड, मारुती चौक, शिवाजीनगर, मेहंदळे हायस्कूल रोड, बस स्टँड समोर रस्त्यावर पाणी एक दोन फुट साचले होते. कित्येक प्रवासी रस्त्यावरचे पाणी ओसरण्याची वात पाहत होते. दमखाडी नाक्यावर पाणीच पाणी झाल्याने दुचाकी व चारचाकी गाड्या पाणी कमी होण्याची वाट पाहात असताना वाहनांच्या रस्त्यावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या.