amba river sudhagad

आंबा नदीने(amba River) धोक्याची पातळी गाठली असून आंबा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सुधागडातील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली.

    पाली : सुधागडमध्ये (Sudhagad)पावसाने दोन दिवस थैमान(Heavy Rain) घातले आहे. रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढायला सुरुवात झाली. आंबा नदीने(amba River) धोक्याची पातळी गाठली असून आंबा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. सुधागडातील काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली.त्या दृष्टीकोनातून सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

    पावसाची सुरु असलेली संततधार पाहता सुधागड तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे सर्व गावांतील सरपंच,पोलीस पाटील,सर्कल अधिकारी, कोतवाल यांना सतर्क राहण्याच्या सूचना तालुका प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती तहसीलदार दिलीप रायन्नावर यांनी दिली.

    सुधागडातील आंबा नदी पात्रातील पाणी पूररेषा नियंत्रणाखाली असले तरी पावसाचा जोर वाढल्यास पाली खोपोली वाकण हा महामार्ग वाहतुकीस बंद करण्यात येईल. पाली आंबा नदी,जांभूळपाडा पूल,भेरव खुरावले नदीवरील पूल या महत्वाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

    अति पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यात नैसर्गिक आपत्ती कुठे झाल्याचे समजण्यात आले नाही.मुसळधार पावसामुळे सुधागडमध्ये काही भागात काळ रात्रीपासून वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून मोबाईल नेटवर्कसुद्धा गायब आहे. त्यामुळे सुधागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.