पेण तालुक्यात पावसाची दमदार बॅटिंग, भोगावती नदीला आला पूर                         

  • श्रावण धारा बरसल्याने तालुक्यातील जनजीवन विस्कळीत
  • तालुक्याला जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे काही ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या पूर सदृश्य स्थिती मुळे नदीकाठी व खाडीकिनारी असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे

पेण – पावसाच्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा बरसू लागल्याने पेणमध्ये दमदार बॅटिंग केली, असून पेण शहरासह तालुक्यात पाणीच पाणी झाले आहे.  गेल्या दोन दिवसापासून तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक छोट्या-मोठ्या नद्या-नाल्यांना पूर आल्यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे सर्व नागरिकांचे हाल झाल्याचे निदर्शनास येत आहे. हवामान खात्याकडून चार ते सहा ऑगस्ट पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याप्रमाणेच हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला असून गेले दोन दिवस पावसाची बॅटिंग चालूच आहे. तालुक्यातील हेटवणे धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून भोगावती नदीला पूर आलेला आहे. तर नदीकाठच्या गावांमध्ये खाडीला भरती आल्यामुळे आजूबाजूच्या  परिसरात पाणी शिरलेले दिसून येत आहे.

तालुक्याला जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे काही ठिकाणी ग्रामीण भागातील जनतेचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. या पूर सदृश्य स्थिती मुळे नदीकाठी व खाडीकिनारी असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जुलै महिन्यात काही दिवस पाऊस न पडल्याने शेतीची वाढ खुंटली होती परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडल्यामुळे शेतकरी राजा आनंदी आहे. परंतु पाऊस अजून चार-पाच दिवस पडला तर शेती ची रोपटी कुजून जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात आहे

तसेच ऐन श्रावण महिन्यात अशा प्रकारचा पाऊस पडल्यामुळे शेतीबरोबरच  भाजीपाल्याची शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. या मुसळधार पावसामुळे काकडी शिराळी पडवळ, घोसाळी या भाज्यांचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले आहे. कारण या मुसळधार पावसाने या झाडांवरील येणारी फुलं झोडपून काढल्याने पुढे पीक हे तुरळक प्रमाणात येणार आहे. त्यामुळे श्रावणधारा बरसल्या परंतु शेतकरी राजा कभी खुशी कभी गम या मनस्थितीत आहे.