म्हसळ्यात होम क्वारंटाईनचा कालावधी १४ की २८ दिवसांचा यावरून लोकांमध्ये संभ्रम

म्हसळा : राज्यासह देशात थैमान घातलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारने देशात चौथ्यांदा ३१ मेपर्यत लॉकडाऊन घोषित केले आहे. मुंबईत कोरोना विषाणू बाधित वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता व

 म्हसळा : राज्यासह देशात थैमान घातलेल्या कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारने देशात चौथ्यांदा ३१ मेपर्यत लॉकडाऊन घोषित केले आहे. मुंबईत कोरोना विषाणू बाधित वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता व भविष्यात उद्भवणारा धोका टाळण्यासाठी कोकणातील हजारो चाकरमान्यांनी आपल्या मुळगावाकडे धाव घेतली असून गाव गाठले आहे. गावात आल्यावर काही गावांमध्ये स्थानिक गावकऱ्यांकडून मिळणारी दुजाभावाची वागणूक आणि कोरोना साथ रोग आजाराचे पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेले नियम/अटी पाळताना अनेक चाकरमानी हैराण होऊन गेले आहेत. मुंबई, पुणे सारख्या रेड झोन शहरातून गावात आलेल्यांना शासनाच्या नियमानुसार होम क्वारंटाइन करण्यात येत आहे. राज्य शासनाने १४ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी दिला असताना रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिह्यात २८ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी आहे.

 म्हसळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत आणि म्हसळा नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावागावात, वाडी वस्तीवर हजारोंच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी गावात आलेले आहेत. या सर्वांना होम क्वारंटाईन केले आहे. परंतु या क्वारंटाइन केलेल्या नागरिकांना नक्की किती दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवणार यावरून ग्रामीण भागात नागरिकांच्यात संभ्रम निर्माण झाला आहे. कारण होम क्वारंटाईन बाबत कोरोना संसर्ग नियंत्रण पथक यांच्याकडून वेगळी माहिती, ग्रामसेवक, शिक्षक यांच्याकडून वेगळी माहिती, आरोग्य विभागाचे डॉक्टर, अधिकारी यांच्याकडून वेगळी माहिती, तर तहसीलदार व महसूल विभाग अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून वेगवेगळी माहिती सांगण्यात येते.या सर्व गोंधळलेल्या परिस्थितीत म्हसळा तालुक्यात होम क्वारंटाईनचा कालावधी नक्की किती दिवसांचा आहे..? असा प्रश्न येथील नागरिकांना पडला असून आम्ही १४ दिवस क्वारंटाइन रहायचे की २८ दिवस राहायचे…अशी विचारणा गावागावात होत असून शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याने ग्रामीण भागातील नागरिक संभ्रमात आहेत. तर प्रशासनात नाही ताळमेळ, गावात होतंय सगळीच भेळ अशीच काहीशी अवस्था तालुक्याची झाली आहे आणि या परिस्थितीतुन गावकरी आणि मुंबईकर चाकरमानी यांच्यात अनेक समज गैरसमज निर्माण होत असून गावागावात छोटे मोठे वादविवाद होत आहेत.
तालुक्यातील काही गावांमध्ये १४ दिवस तर काही गावांमध्ये २८  दिवसांचा क्वारंटाईन अशा प्रकारचा भेदभाव आणि त्याच्यातून गावा गावांमध्ये होणारे मुंबईकर व स्थानिक ग्रामस्थांमधील वाद आणि जवळच आलेला पावसाळा त्यात शेतीची रखडलेली कामे या सविस्तर बाबी लक्षात घेऊन तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी व संबंधित अधिकारी वर्गाने नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करावे अशी मागणी होत आहे. 
रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात २८ दिवसांचा होम क्वारंटाइन कालावधी आहे. हा आदेश ज्या ज्या नागरिकांना क्वारंटाईन केलेले आहे त्या सर्व नागरिकांनी पाळणे बंधनकारक आहे.  – डॉ. गणेश कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी म्हसळा