उत्कृष्ट वैद्यकिय सेवा, आपत्कालीन सेवेबद्दल डॉक्टरांचा पालक मंत्र्यांकडून सन्मान

आरोग्य अधिकारी शासकिय अधिकारी व आपत्ती काळात मदत करणाऱ्या सेवाभावी संस्था यांचा गौरव आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायगडच्या पालकमंत्री तथा उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

महाड : रायगड जिल्ह्यातील कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निसर्ग चक्रीवादळ अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत चांगली कामगिरी बजावल्याने, आरोग्य अधिकारी शासकिय अधिकारी व आपत्ती काळात मदत करणाऱ्या सेवाभावी संस्था यांचा गौरव आज स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रायगडच्या पालकमंत्री तथा उद्योग राज्य मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आला.

महाड ग्रामीण रुग्णालयात तसेच कोव्हीड केअर सेंटर व प्राथमिक आरोग्य केंद्रातून गेली ४ महिने कोव्हीड १९ व इतर आजाराचे रुग्ण यांना चांगली आरोग्य सेवा देणारे,  महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ भास्कर जगताप व महाड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एजाज बिराजदार त्याच प्रमाणे मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पूरात गोरेगांव पोलादपूर मध्ये अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करणाऱ्या प्रशांत साळुंखे यांचा गौरव आज स्वातंत्र्य दिनी अलिबाग येथे शासकिय ध्वजवंदनाचा कार्यक्रम झाल्यानंतर पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. 

संपूर्ण रायगड जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालया पैकी महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ भास्कर जगताप यांना उत्कृष्ठ रुग्ण सेवेचा पुरस्कार मिळाल्याने संपूर्ण तालुक्यातुन डॉ. जगताप यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्याच प्रमाणे तालुका आरोग्य अधिकाऱ्याची भूमिका बजावून बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि महाडमधील कोव्हीड केअर सेंटर ची जबाबदारी उत्तम पणे पार पाडणाऱ्या डॉ. बिराजदार यांचेही सर्व स्तरातून कौतुक होत आहे.