pravin darekar in mahad

महाड : कोरोना महामारी रोखण्यासाठी ज्या आवश्यक व्यवस्था उभ्या करणे गरजेच्या होत्या त्या व्यवस्था व सोयी सुविधा उभ्या करण्यास राज्य सरकार अपयशी ठरले असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर(pravin darekar) यांनी महाडमधील पत्रकार परिषदेत केला.तसेच तारीक गार्डन दुर्घटनाग्रस्तांसाठी(tarique garden) शासन घराची सोय कधी करणार असा प्रश्नही त्यांनी विचारला.

महाड पोलादपूर दौर्‍यावर असणाऱ्या विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी महाड एमआयडीसीतील एम एम ए कोव्हीड केअर सेंटरला भेट(covid centre visit) देत त्या ठिकाणी असणाऱ्या व्यवस्थेची पाहणी केली यानंतर महाड येथे हॉटेल विसावामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांचे समवेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष अॅड महेश मोहीते, जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुका अध्यक्ष जयवंत दळवी, महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रविण दरेकर यांनी महाड येथील कोव्हीड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर व पुरेसे आरोग्य सेवकांची व्यवस्था नाही महाड एम आय डीसीतील कोव्हीड सेंटर उद्घाटनाच्या वेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी लागणारी सर्व व्यवस्था उभी केली जाईल,असे आश्वासन दिले होते. मात्र, त्याची पुर्तता केली नाही राज्यभरात कोव्हीड संदर्भात केलेल्या दौऱ्यानंतर हे सरकार केवळ घोषणा करीत आहे. सत्ताधाऱ्यांच्या कर्णी आणि कथनीत फरक आहे असा टोला दरेकर यांनी लगावला. रायगड जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात ज्या झपाट्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत आणि मृत्यूचा दर वाढू लागला आहे ते पाहता कोरोनाला रोखण्यासाठी रायगड जिल्ह्याचा मास्टर प्लॅन तातडीने तयार करावाअशी मागणी दरेकर यांनी केली.

मुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांची भेट घेऊन शासनाने व्हेंटीलेटर आणि डॉक्टरची व्यवस्था करावी अशी मागणी आपण केली असल्याचे दरेकर यांनी सांगितले. महाड येथील कोव्हीड सेंटर व्हावे यासाठी ८४ लाखाचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून उद्या पुर्नवसन मंत्री वेडट्टीवार यांचे सोबत बैठक असून हे सेंटर लवकर व्हावे यासाठी आपला प्रयत्न असेल असे आश्वासन दरेकर यांनी दिले.

महाडमधील कोव्हीड सेंटर व ग्रामीण रुग्णालयात आरोग्य सेवकांची संख्या अपुरी आहे हे निदर्शनास आणून देताच अधिवेशनात आपण ही मागणी केली होती मात्र सरकार व प्रशासनामध्ये समन्वय नसून सरकारची अवस्था भांबावलेली असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे असे दरेकरांनी स्पष्ट केले. महाड कोव्हीड सेंटर येथील रुग्ण खासगी हॉस्पिटल मध्ये पाठवले जात आहेत या ठिकाणी एखादे रॅकेट कार्यरत आहे का अशी विचारणा पत्रकारांनी केली असता त्याबाबत चौकशी केली जाईल असे दरेकर यांनी सांगितले.

तारीक गार्डन दुर्घटनेनंतर बेघर झालेल्या रहिवाशांच्या पुर्नवसनाबाबत शासनाने काहीही कार्यवाही केली नाही या रहिवाशांची एका हॉलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. शासनाने या बेघर रहिवाशांची व्यवस्था भाड्याचे घरात करावी अन्यथा त्यांना भाड्याची रक्कम द्यावी,अशी मागणी दरेकर यांनी केली. निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्त अद्याप उपेक्षितच आहेत त्या प्रकरणांची चौकशी करावी लागेल असे दरेकर यांनी स्पष्ट केले. राज्यात इमारती कोसळण्याचे प्रकार वारंवार घडत असून यापूर्वी शहरातील हे लोण ग्रामिण भागाकडे सरकू लागले आहेत या संबंधी मास्टर प्लॅन तयार करून या प्रकरणात दोषी असणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांपासून या साखळीत जबाबदार असणाऱ्या प्रत्येक घटकावर कारवाई करण्यात तरतूद करण्यात यावी अशी व्यवस्था कायद्यात व्हावी,असे दरेकर यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबत सरकारचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरला असे स्पष्ट करीत हे आरक्षण मिळण्यासाठी आम्ही सरकार सोबत आहोत असे दरेकरांनी सांगितले.