rape

  • रोहा तालुक्यातील तांबडी येथे रविवारी सायंकाळी एका चौदा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करत तिची निर्दयपणे हत्या करण्याची घटना घडली. या घटनेनंतर रोहासह रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अखिल भारतीय मराठा समाजाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहा अंबरे व राज्य संघटक हेमंत देशमुख यांनी तांबडी येथे पीडितेच्या घरी भेट देत तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले

रोहा: रोह्यातील तांबडी येथील घडलेल्या अमानुष घटनेत पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरुन आंदोलन करु असा सुचक इशारा अखिल भारतीय मराठा समाजाच्या रायगड जिल्हा अध्यक्षा स्नेहा अंबरे यांनी मंगळवारी झालेल्या पदाधिका-यांच्या बैठकीत दिला. रोहा तालुक्यातील तांबडी येथे रविवारी सायंकाळी एका चौदा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करत तिची निर्दयपणे हत्या करण्याची घटना घडली. या घटनेनंतर रोहासह रायगड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. अखिल भारतीय मराठा समाजाच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहा अंबरे व राज्य संघटक हेमंत देशमुख यांनी तांबडी येथे पीडितेच्या घरी भेट देत तिच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यासंबंधी तांबडी येथील बालिकेवर अतिप्रसंग करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमास लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी असे केले नाही तर रायगड जिल्ह्यातील सर्व मराठा समाज आंदोलन करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले.

मंगळवारी ४ ऑगस्ट रोजी रोहा येथील शिवाजी नगरमधील शिवतिर्थ निवास येथे पदाधिका-यांची बैठक झाली. यावेळी रायगड जिल्हा मराठा समाज अध्यक्ष व्ही.टी.देशमुख, कोंकण विभागीय मराठा महासंघ सरचिटणीस व राज्य संघटक हेमंत देशमुख, जिल्हा महिला अध्यक्षा स्नेहा अंबरे, कोळी समाज रायगड जिल्हा अध्यक्ष जयवंत पोकळे, कोळी समाज नेते नवनीत डोलकर, उत्तम नाईक व विविध तालुक्यातील मराठा महासंघाचे पदाधिकारी व रोह्यातील महिलावर्ग उपस्थित होते.  रोहा तालुक्यातील तांबडी येथे रविवार २६ जुलै रोजी चौदा वर्षीय बालिकेवर बलात्कार व त्यानंतर तिची निर्दयपणे हत्या हि घटना घडल्यामुळे सर्वत्र संतापाची लाट निर्माण होत तालुक्यातील महिला व युवतिंच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी बारा तासांच्या आत या घटनेमागील एका नराधमास शोधून काढत जेरबंद केले.   

तांबडी येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करत तीची हत्या करणे हा प्रकार माणुसकिला काळिमा फासणारा आहे. त्यातील उर्वरित नराधमाना लवकरात लवकर जेरबंद करुन कठोर शिक्षा झाली तरच त्या पीडितेला व तिच्या कुटुंबियांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. यासोबतच रोहा तालुक्यातील सुदर्शन कंपनीच्या कॉरंटाईन सेंटर मध्ये एका युवती बरोबर छेडछाड करण्याचा प्रसंग घडला. त्याचे काही दिवस आधी कोलाड येथे एका चार वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग होण्याचा प्रकार पालकांच्या सतर्कतेमुळे होता होता वाचला. या सर्व घटनांमुळे महिला वर्गात असुरक्षिततेची भावना रोहा तालुक्यात निर्माण झाली आहे.

या घटनेसंदर्भात मराठा समाज आता स्वस्थ बसणार नाही अशी भूमिका या बैठकीत घेण्यात आली. रायगड जिल्ह्यामध्ये सलग होत असलेल्या या घटनांमुळे आज महिलावर्गामध्ये  आपापल्या कुटुंबातील मुलींबाबत प्रचंड असुरक्षीततेची भावना निर्माण झाली असून तांबडी येथील घटनेमुळे संतापाची लाट उसळली आहे. न्याय न मिळाल्यास समस्त महिला वर्ग रस्त्यावर उतरुन आंदोलन छेडणार असल्याच्या रायगड जिल्हा अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्षा स्नेहा अंबरे म्हणाल्या. त्याचप्रमाणे मराठा समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार होऊन निर्घृण हत्या करण्यात आली.

त्या मुलीला न्याय न मिळाल्यास रोहासह रायगड जिल्ह्यातील व राज्यातील मराठा समाजाच्या सर्व संघटना एकत्र येत आंदोलन करु असे मत कोंकण विभागीय मराठा महासंघ सरचिटणीस व राज्य संघटक हेमंत देशमुख व्यक्त केले.यावेळी बैठकीला उपस्थित कोळी समाज नेते जयवंत पोकळे, नवनीत डोलकर व उत्तम नाईक यांनी आमचाही या आंदोलनाला पाठिंबा राहील असे सांगितले. आता जर अश्या नराधमांना शासन करण्यास दिरंगाई झाली तर रायगड जिल्ह्यातील मराठा समाज व विविध समाजाच्या आक्रमक संघटना एकत्र येऊन रस्त्यावर उतरत आंदोलन करतील असा इशारा राज्यशासनाला दिला आहे.