गणेशोत्सवात ग्राहकांना स्वस्त धान्य आणि मोफत धान्याला मुकावे लागणार

बायोमेट्रिक मशीनद्वारे शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा करण्यास रास्त भाव धान्य दुकानदारांचा कडाडून विरोध

महाड :कोरोनाबाधित शिधापत्रिका धारक ग्राहकांच्या संपर्कात आल्याने रायगड जिल्ह्यातील चार ते पाच रास्त भाव धान्य दुकानदारांना जीव गमवावे लागले. तर पन्नासहून अधिक दुकानदार कोरोनाने बाधित झाले आहेत. तरीही चार महिन्यानंतर पुन्हा बायोमेट्रिक मशीनवर ग्राहकांच्या अंगठ्याचे ठसे घेऊन धान्य वितरित करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिल्याने शासनाच्या या गळचेपी भूमिकेला जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानदारांनी कडाडून विरोध केला आहे.  

    राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना आणि मोफत धान्य पुरवठा योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अकराशे रास्तभाव धान्य केंद्रातून अंत्योदय आणि प्रधान्य कुटुंबाचे लाभार्थी असलेल्या साडेचार लाख शिधापत्रिका धारकांना लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात सोशल डिस्टन्सिगचे नियम पाळून बायोमेट्रिक मशीनचा वापर न करता ऑफलाइन पद्धतीने धान्य वितरित करण्यात आले. मात्र, ऑगस्टपासूनचे धान्य बायोमेट्रिक मशीनवरच ग्राहकांचे अंगठे घेऊन वितरित करण्यात यावे, असा आदेश शासनाने जारी केला आहे. त्यामुळे कोरोनाच्या भीतीने अगोदरच भयभीत झालेल्या रायगड जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांमध्ये आरोग्यसंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. दुकानदारांच्या कोरोना संदर्भातील वैद्यकीय तपासण्याही करण्यात आल्या नसल्याने नवीन अडचणी निर्माण झाल्या आहेत. शासनाकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत चौकशी न केल्याने रास्तभाव धान्य दुकानदार आणि ग्राहकांच्या आरोग्यासंबंधीचा प्रश्न निर्माण झाला आहे. गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेला असताना दुकानदारांकडून लाभार्थ्यांना अन्नधान्य मिळणार किंवा कसे याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असून दुकानदार संघटनांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

      शासनाच्या निर्देशाप्रमाणे रास्तभाव धान्य दुकानदार कोरोना बाधित झाले असल्यास सदरच्या दुकानाचा ताबा नजीकच्या केंद्रातील दुकानदाराकडे देणे अनिवार्य आहे. प्रत्येक दुकानदाराकडे घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेता ही लागण पुढे पसरू नये म्हणून शासनाने त्वरित निर्णय जाहीर करावा, अशी मागणी तालुक्यातील जनतेकडूनही केली जात आहे. मात्र, यासंदर्भात प्रशासनाकडून अधिकृत माहिती उपलब्ध न झाल्याने आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही दुकाने सुरू राहणार किंवा कसे व बंद झाल्यास लाभार्थ्यांना अन्नधान्य गणेशोत्सवापूर्वी कशा पद्धतीने देणार, याबाबत विचारणा केली जात आहे. 

    कोरोना महामारीचे अद्याप संकट टळले नसल्याने ज्याप्रमाणे एप्रिल ते जुलैपर्यंत बायोमेट्रिक मशीनवर रास्तभाव धान्य दुकानदारांचा अंगठा लावून लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण केले आहे. त्याप्रमाणे यापुढेही अन्नधान्याचे वितरण होण्यासाठी अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघातर्फे उच्च  न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार  आहे.

     रायगड जिल्ह्यात कोरोनाची स्थिती अत्यंत चिंताजनक आहै. बायोमेट्रिक मशीनद्वारे ग्राहकांचे अंगठे घेऊन धान्य वितरित करताना सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन केले जात नाही. त्यामुळे ग्राहकांबरोबरच दुकानदारांच्याही आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. शासनाने रास्तभाव धान्य दुकानदारांचा विमा उतरावा. शिवाय लॉकडाऊन संपेपर्यंत ग्राहकांना ऑफलाइन धान्य वितरित करण्याची आम्हाला मुभा देण्यात यावी, अशी मागणी रास्त भाव दुकानदार संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष प्रमोद घोसाळकर यांनी केली आहे.