In Mahad the rainfall crossed the milestone of 3000 mm
महाडमध्ये पावसाने ३ हजार मिलिमीटरचा टप्पा केला पार

महाड : महाड तालुक्यात (Mahad tehsil) आज ३०९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून गेल्या पाच वर्षातील पावसाची (rain) सरासरी पाहता यावर्षी सरासरी एवढा पाऊस आत्तापर्यत झाला आहे. मात्र गत वर्षी आजच्या तारखेपर्यत झालेल्या पावसाची बरोबरी गाठण्यास आणखी १००० मिली मीटर पावसाची गरज आहे. भातशेतीसाठी (rice crop) या वर्षी झालेला पाऊस समाधानकारक असून तालुक्यातील भात शेती चांगली झाली असल्याचे कृषी खात्याकडून सांगितले आहे.

गेल्या पाच वर्षांच्या महाड तालुक्यात झालेल्या पावसाच्या नोंदीप्रमाणे चालू वर्षीदेखील पावसाने तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला असून मागील पाच वर्षांत तीन हजार पेक्षा जास्त पावसाची नोंद तीन वेळा झाल्याची माहिती आपत्ती कक्षातून प्राप्त झाली आहे. दरम्यान महाड तालुक्यात झालेल्या या सरासरी पावसाने तालुक्यात टंचाईग्रस्त गाव गावांच्या परिसरात पिण्याच्या पाण्याचे नियोजन व पाणी अडवीणेबाबत तातडीने कार्यवाही पाटबंधारे विभागाने सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

चालू वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्या पासूनच पावसाची सुरुवात नियमितपणे झाली होती मात्र जुलै व ऑगस्टमधील काही आठवड्यांचा अपवाद वगळता नियमितपणे पावसाने आपली हजेरी लावल्याने शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसात पावसाने पुन्हा सुरुवात केली असून हा पाऊस देखील भातशेती करता उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या ५ वर्षाच्या पावसाचे सरासरी अंदाजाकडे लक्ष दिल्यास प्रतिवर्षी सुमारे ४ हजार मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली होती. तालुक्यातील पावसाचे सरासरी प्रमाण ३ हजार ते ३ हजार ४०० एवढे राहिल्याचे दिसून येते. गेल्या दहा वर्षांचा भातशेती संदर्भातील कृषी खात्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार एकूण लागवडीच्या क्षेत्रापैकी निम्म्यापेक्षा काही प्रमाणात जास्त लागवड केली जात आहे.

ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी महानगरातून गावाकडे येणे पसंत केले होते याचा दृश्य परिणाम भातशेतीचा कामावर झाल्याची माहिती उपलब्ध होत असून ग्रामीण भागात प्रती वर्षापेक्षा यावर्षी जास्त भात लागवड झाल्याचे सांगितले जात आहे. चालू वर्षी आलेल्या कोरोना महामारीने ग्रामीण भागात महानगरातून आलेल्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय राहिली होती.

एकूणच गेल्या दहा वर्षांच्या महाड तालुक्यातील पावसाच्या झालेल्या सरासरी नोंदीप्रमाणे चालू वर्षी देखील तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पावसाने सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पार केला आहे. यामुळे पुढील आठ महिन्यांत तालुक्यातील होणारी पाणीटंचाई दूर होईल किंवा कसे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शासनाच्या पाटबंधारे विभागाकडून केल्या जाणाऱ्या विविध उपाययोजनांचा लाभ टंचाईग्रस्त ग्रामस्थांना व्हावा म्हणून शासनाने यासंदर्भात गतीने पावले उचलावीत अशा अपेक्षा तालुक्यातील टंचाईग्रस्त ग्रामस्थांकडून केली जात आहे.