म्हसळ्यात स्वच्छता मोहिमेची ऐशी तैशी, गटारे सांडपाण्याने भरली

म्हसळा - स्वच्छतेच्या नावावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या म्हसळा नगरपंचायतिच्या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. शहरात अनेक ठिकाणी गटारे उघडी आहेत तर या गटारातून

 म्हसळा – स्वच्छतेच्या नावावर लाखो रुपये खर्च करणाऱ्या म्हसळा नगरपंचायतिच्या स्वच्छता मोहिमेचा बोजवारा उडत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. शहरात अनेक ठिकाणी गटारे उघडी आहेत तर या गटारातून सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने कित्येक महिने गटारे तुडूंब भरून राहिलेली असून गटाराच्या पाण्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. तर तुंबलेली गटारे साफ करण्यासाठी नगरपंचायतच्या स्वच्छता विभागाला वेळच मिळत नाही की काय हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे स्वच्छतेच्या नावाने दवंडी पिटणाऱ्या नगरपंचायतचा कारभार रामभरोसे असून स्वच्छता मोहिमेची ऐशी की तैशी करून टाकल्याची वस्तुस्थिती शहरात पहावयास मिळत आहे. तर अस्वच्छता व दुर्गंधी वातावरणामुळे रोगराई पसरण्याची भीती नागरिकांमधून वर्तविली जात आहे.

एकहाती सत्ता असूनही सत्ताधाऱ्यांना जनतेच्या आरोग्याचे व येथील स्वच्छतेचे काहीच सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे व अतिशय ढिसाळ कारभार सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी स्वच्छतेचे संदेश देणारे सुविचार व स्लोगन शहरातील सरकारी कार्यालयांच्या भिंतींवर आणि इतर ठिकाणी लिहली आहेत परंतु याचा काहीच फायदा झालेला नाही. शहरातील कुंभारवाडा, तांबटआळी, सानेआळी, दिघी रोड नाका, एसटी स्टँड ते पंचायत समिती, डॉ.राऊत परिसर, भाजप कार्यालय, मच्छी मार्केट, नगरपंचायत इमारत ते दिघीरोड नाका, पंचायत समिती, तहसील कार्यालय परिसर, पोलीस स्टेशन ते पाभरा फाटा, दिघी रोड मिनिडोअर व रिक्षा स्टँड, सर्व मोहल्ले, स्टेट बँक ऑफ इंडिया परिसर, एसटी स्टँड, ग्रामीण रुग्णालय अशा विविध परिसरातील नाले, गटारे उघडी असून कचरा व घाण सांडपाण्याने तुडुंब भरलेली आहेत.

गटाराच्या पाण्यात प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या, दारूच्या बाटल्या, छोट्या मोठ्या गाड्यांचे टायर, वाया गेलेला भाजीपाला, सलूनच्या दुकानात कापलेले केस, त्याचबरोबर विविध टाकाऊ वस्तू टाकल्याने गटारे भरलेली आहेत. एकीकडे मात्र दर महिन्याला स्वच्छतेच्या नावाखाली नगरपंचायत लाखो रुपये खर्च करीत आहे तरीही स्वच्छतेच्या नावाने बोंबाबोंब असून उघडी गटारे आणि त्यात तुडूंब साचलेले सांडपाणी पाहून नगरपंचायत लाखो रुपये खर्च करते कुठे ? हा प्रश्न म्हसळा शहरातील नागरिक विचारीत आहेत. तर आता काही दिवसांनी पावसाळा सुरुवात होईल त्या अगोदरच गटारे साफ करणे गरजेचे आहे असे मत काही जाणकार व्यक्त करीत आहेत.

नागरिक व नगरपंचायत मधे स्वच्छतेबाबत समन्वय नाही…

नगरपंचायत मार्फत कचरा गोळा करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे व कचरा गोळा करणारी गाडी घेऊन कर्मचारी शहरात फिरत असतात परंतु काही नागरिक मोठ्या प्रमाणात घरातील कचरा उघड्यावर टाकत असल्याने त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही तर हा कचरा गुरे, कुत्री खाऊन त्याची सर्वत्र नासधूस करतात आणि बऱ्याच वेळा हा कचरा उघड्या गटारात जाऊन साचून राहतो त्यामुळे गटारे सांडपाण्याने भरलेली आहेत. या सर्व प्रकारामुळे शहरातील नागरिक व नगरपंचायत मधे समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीने स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे गरजेचे आहे. 

स्थानिकांची प्रतिक्रिया 

” म्हसळा शहरातील गटारे उघडी असून ती खराब सांडपाण्याने भरलेली आहेत. थोड्याच दिवसांत पावसाळा सुरुवात होईल अशा परिस्थितीत तुंबलेली उघडी गटारे, नाले, शहराच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकतात. नगरपंचायत प्रशासन शहरातील गटारे, नाले, सफाई करताना भेदभाव करीत असल्याचे काही प्रमाणात दिसून येते. काही ठिकाणी काही खास नगरसेवकांच्या वार्डातील गटारे साफ करण्यात आलेली आहेत परंतु मुख्य बाजारपेठ, एसटी स्टँड, पाभरे फाटा, व अन्य परिसरातील गटारे साफ केलेली नाहीत. पावसाळ्यापूर्वीच सर्व गटारे साफ करणे गरजेचे आहे. – श्री.अनिकेत पानसरे, शहर अध्यक्ष – शिवसेना म्हसळा