एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात महाड तालुक्यातील ६ ग्रामपंचायतीमधील नऊ वाड्यांमध्ये पाणीटंचाई

महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतून प्रस्ताव येण्यास अखेर सुरूवात झाली असून पंचायत समितीच्या सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सहा ग्रामपंचायतीमधील नऊ वाड्या वस्त्यांमधून पाणीटंचाईचे प्रस्ताव पंचायत समिती प्रशासनाकडे विहित नमुन्यात पाठवण्यात आले असून यापुढील मंजुरीसाठी ते जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येतील असे सांगितले गेले आहे.

  महाड : काही दिवसांपूर्वी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी रायगड प्राधिकरणाच्या पुढाकारातून रायगड किल्ल्याच्या परिसरातील गावांसह महाड-पोलादपूर तालुक्यात भेडसावणाऱ्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी परिषद आयोजित केली होती. या परिषदेत येत्या दोन महिन्यात प्रायोगिक तत्वावर नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करणारा पायलट प्रोजेक्ट राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या टंचाईग्रस्त गावातील पाण्याचे स्त्रोत शोधून काढून तेथील पाणी टंचाई दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन उपस्थित सर्व पक्षीय लोक प्रतिनिधींच्या उपस्थितीत देण्यात आला.

  मात्र या दोन तालुक्यात अपूर्णावस्थेत असणाऱ्या धरणांची कामे मार्गी लागण्याबाबत कोणतीच चर्चा करण्यात आली नाही. या परिषदेला ८ दिवस होत नाही तर महाड तालुक्यातील ६ ग्राम पंचायती मधील ९ वाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवू लागली असून या ग्राम पंचायतीकडून टँकरने पाणी पुरवठा करण्याचे प्रस्ताव महाड पंचायत समितीकडे प्राप्त झाले आहेत.

  महाड तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांतून प्रस्ताव येण्यास अखेर सुरूवात झाली असून पंचायत समितीच्या सूत्रांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सहा ग्रामपंचायतीमधील नऊ वाड्या वस्त्यांमधून पाणीटंचाईचे प्रस्ताव पंचायत समिती प्रशासनाकडे विहित नमुन्यात पाठवण्यात आले असून यापुढील मंजुरीसाठी ते जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात येतील असे सांगितले गेले आहे.

  मागील वर्षी मार्च महिन्यातच महाड ग्रामीण भागात पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली होती या तुलनेत प्रतिवर्षी झालेल्या सरासरीपेक्षा जास्त पावसाचा फायदा या टंचाईग्रस्त गावांना होऊन एक महिना भर अधिक मोठ्या क्षमतेने पाणी त्यांना उपलब्ध झाले मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून या सहा ग्रामपंचायती ज्यामध्ये कावळे धनगरवाडी, कुंभार्डे धनगरवाडी, रावतळी मानेधार ,नातोडि मेढेकर वाडी ,सोनारवाडी, फड मोहल्ला ,पांगारी धार ,व करंजाडी म्हस्के कोडचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

  मागील वर्षापर्यंत स्थानिक पातळीवर टँकर मंजुरी करण्याचे अधिकार प्रांताधिकार्यांकडे वर्ग करण्यात आले होते मात्र आजपावेतो अशा संदर्भातली कोणतीही सूचना स्थानिक पातळीवर देण्यात आली नसल्याची खात्रीशीर माहिती हाती आली आहे.

  तसेच मे महिन्याच्या आरंभीच एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात महाड तालुक्यात चालूवर्षी पाणी टँकरची निकड निर्माण झाल्याने या संदर्भात शासकीय निर्देशानुसार टँकरची व्यवस्था करून जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी येताच तातडीने तालुक्यातील ज्या ठिकाणी अत्यावश्यक आहे अशा सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात येईल व स्थानिक पातळीवर याबाबत कोणतीही दिरंगाई होणार नाही अशी स्पष्टोक्ती काही दिवसांपूर्वीच महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांनी दिली होती. या सर्व पार्श्र्वभूमीवर महाड तालुक्यातील हजारो नागरिकांना यावर्षी पुन्हा एकदा पाणीपुरवठा धरणांची कामे पूर्ण न झाल्याने टँकरद्वारे मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून राहावे लागणार आहे.