अन् नियतीचा पुन्हा त्याच्यावर अन्याय, शासनाने नावीदच्या नोकरीची व्यवस्था करावी : परवेझ कौचाली

नावीद याच्या उपचारासाठी आत्तापर्यत सुमारे १३ लाखाचा खर्च झाला असून छोटी मोठी इलेक्ट्रीशियनची कामे करणारा एकुलता एक मुलगा जखमी अवस्थेत असताना हा खर्च करायचा कसा असा प्रश्न नावीद च्या आई वडीलांपुढे आहे आपल्या जीवाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त ३५ रहिवाशांचा जीव वाचवणाऱ्या नावीद ला शासनाने सरकारी नोकरी देऊन त्या चा यथोचित सन्मान करावा.

महाड : महाडमधील तारीक गार्डन मधील रहिवाशांसाठी फरिश्ता ठरलेला आणि मानवतेच्या भावनेतून स्वतः च्या जीवाची पर्वा न करणारा नावीद दुस्ते याच्यावर नियतीने मात्र अन्यायच केला. महाडमधील या दुर्घटनेत ३५ जणांचे जीव वाचवणाऱ्या नावीदला यावेळी आपला एक पाय गमवावा लागला व एका पाया वर अपंगत्व आले. नियती एवढ्या वरच थांबली नाही काही दिवसातच नावीद आपल्या कुटुंबाचे छप्परही गमावून बसला आहे. महाडच्या या दुर्घटनेत अनेकांचे जीव वाचवणाऱ्या नावीदला शासनाने शासकिय नोकरीत सामावून घेत (the government should arrange Naveed’s job) त्याच्या कार्याचा योग्य तो सन्मान करावा अशी मागणी नावीदचे भावोजी परवेझ कौचाली यांनी केली आहे.

महाड शहरातील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत ज्यावेळी कोसळली त्यावेळी अल कासीम इमारती मध्ये आपल्या आई वडीलांसोबत राहणारा नाविद दुस्ते (मुळ रा. जुई, ता. महाड ) हा तरुण नेहमी प्रमाणे तारीक गार्डन मधील आपल्या मित्राना भेटायला गेला होता ही इमारत कोसळणार असे दिसताच त्याने समयसूचकता दाखवत या इमारती मधील ३० ते ३५ जणांना बाहेर काढले, मात्र एका वृद्ध महिलेला वाचवण्यासाठी गेलेल्या नावीद च्या पायावर स्लॅब कोसळून तो गंभीर रित्या जखमी झाला. त्याला तातडीने नवी मुंबईतील अपोलो हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी दाखल केले. या ठिकाणी त्याचा एक पाय ढोपरापासून खाली कापण्यात आला तर दुसऱ्या पायात रॉड टाकण्यात आले आहेत.

एवढे सारे होऊनही नावीदने आपले दुःख कुरवाळीत न बसता अथवा त्याचे भांडवल न करता आपल्या घरच्यांना धीर दिला आहे. या दुर्घटनेत ३५ जणांचे जीव वाचवले यातच मी स्वतःला भाग्यवान समजतो असे नाविद साऱ्यांना सांगत आहे. नियती एवढ्यावरच थांबली नाही तर नविद ज्या इमारती मध्ये राहात होता ती अल कासीम इमारत पालिकेने धोकादायक ठरवली असून या इमारती मध्ये राहणाऱ्या रहिवाशांना इमारत खाली करण्यास सांगितले आहे. त्यामुळे एकीकडे कमावता मुलगा अपंग होऊन घरी बसल्याचे आणि डोक्यावरील छप्पर ही हरवल्याचे दुहेरी संकट नावीद च्या कुटुंबावर कोसळले आहे.

नावीद याच्या उपचारासाठी आत्तापर्यत सुमारे १३ लाखाचा खर्च झाला असून छोटी मोठी इलेक्ट्रीशियनची कामे करणारा एकुलता एक मुलगा जखमी अवस्थेत असताना हा खर्च करायचा कसा असा प्रश्न नावीद च्या आई वडीलांपुढे आहे आपल्या जीवाची पर्वा न करता दुर्घटनाग्रस्त ३५ रहिवाशांचा जीव वाचवणाऱ्या नावीद ला शासनाने सरकारी नोकरी देऊन त्या चा यथोचित सन्मान करावा अशी मागणी परवेझ कौचाली व त्यांच्या नातेवाईकांनी केली आहे.