इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी मागतायत लाच – तटकरेंनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली यासंदर्भात बैठक आयोजित करण्याची मागणी

श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरामध्ये अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव बँकेकडून अनेक जणांनी व्यावसायिक कर्ज घेतलेली आहेत. या कर्जाची सुरक्षा म्हणून बँकेने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अशा कर्जदारांचा विमा उतरवला

श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरामध्ये अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव बँकेकडून अनेक जणांनी व्यावसायिक कर्ज घेतलेली आहेत. या कर्जाची सुरक्षा म्हणून बँकेने ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून अशा कर्जदारांचा विमा उतरवला आहे. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर श्रीवर्धनमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामध्ये अनेक व्यावसायिकांनी घेतलेले कर्ज ज्या व्यावसायिक कामासाठी वापरले होते अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून त्यांच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले होते. परंतु पंचवीस ते तीस लाख रुपयांचे नुकसान असलेल्या ठिकाणी चार लाख रुपये मिळतील त्यातले एक लाख रुपये आम्हाला द्या अशा प्रकारची लाच मागण्याचा प्रकार श्रीवर्धनमध्ये सर्रासपणे सुरू आहे. काहीजणांकडे तर पन्नास हजार रुपये अॅडव्हान्स द्या, त्यानंतर तुमचा विमा पास केला जाईल. अशा प्रकारची लाच मागण्यात आली. या प्रकाराची माहिती श्रीवर्धन येथे आलेल्या खासदार सुनील तटकरे यांना समजल्यानंतर त्यांनी असा प्रकार घडलेल्या नागरिकांना बोलावून घेतले. या नागरिकांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे लेखी तक्रार केली असून रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याजवळ भ्रमणध्वनीवर संपर्क साधून तातडीने याबाबत बैठक ठेवण्याच्या सूचना दिल्या व त्याठिकाणी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवण्याच्या सूचनादेखील दिल्या. अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह बँकेने कर्जदारांना दिलेल्या कर्जानंतर विमा पॉलिसी काढलेली आहे याची माहिती कर्जदारांना देण्यात आलेली नव्हती. असेही तक्रारदारांकडून सांगण्यात आले. तरी अशा प्रकारे लाच मागणाऱ्या ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई होते याबद्दल तक्रारदार नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.