खांदा वसाहतीत स्वच्छतादुतांवर पुष्पवर्षा करून, कोरडा शिधा देऊन व्यक्त करण्यात आली कृतज्ञता

पनवेल : कोरोनाच्या संकटात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छतादुतांवर आज खांदा वसाहतीत पुष्पवर्षाव करण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेविका सिताताई पाटील

पनवेल : कोरोनाच्या संकटात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या पनवेल महापालिकेच्या स्वच्छतादुतांवर आज खांदा वसाहतीत पुष्पवर्षाव करण्यात आला. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेविका सिताताई पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील खाडे यांच्या सहकार्याने कामगारांना आठ दिवस पुरेल इतके धान्य देऊन एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. 

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे  भीतीचे वातावरण तयार झाले आहे. महापालिका क्षेत्रात ७  व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यूही  झालेला आहे. कोरोना विषाणूंचे संक्रमण होऊ नये म्हणून लॉकडाऊन सुरू आहे. या संकटातही पनवेल महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. मनपा क्षेत्रातील रस्ते, पदपथ स्वच्छ करणे, झाडू मारणे, झाडाचा पालापाचोळा जमा करणे, डोअर टू डोअर जाऊन कचरा संकलित करणे, परिसरात फवारणी करून निर्जंतुकीकरण करणे, पावडर मारणे यासारखी अनेक कामे संबंधित स्वच्छतादूत करीत आहेत. त्यामुळे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता दिसून येते. अशाप्रकारे साथीच्या रोगाचा संसर्ग होत असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे आरोग्य अबाधित राखणाऱ्या या स्वच्छतादुतांचे काम खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. त्यांच्या या कामाबद्दल खांदा वसाहतीत नगरसेविका सीता पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील खाडे यांच्यासह इतरांनी कृतज्ञता व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. वसाहतीतील पाण्याच्या टाकीजवळ आज स्वच्छता कर्मचाऱ्यांना आदरपूर्वक निमंत्रित करण्यात आले. सामाजिक अंतराचे पालन करीत या सर्वांंवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना जीवनावश्यक कोरडा शिधा वाटप करण्यात आला. यावेळी शशिकांत खाडे, ज्ञानेश्वर देशमुख व शशिकांत योगे यांनीही आपले योगदान दिले. यावेळी उपसचिव रविंद्र गुरव, कळंबोली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश खेडकर, सदानंद पाटील, भाजपच्या महिला कार्यकर्त्या अनिता रासकर चेतन जाधव, मिथुन दर्गे, तन्मय सावंत उपस्थित होते.