खारघरच्या सेक्टर १५ मधील घरकुल सोसायटीकडे जाणारे रस्ते सील

पनवेल : पनवेल महापालिकेने कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केलेल्या खारघर सेक्टर १५ मधील घरकुल सोसायटीतील रहिवाशांचा लगाम ओढत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी तिकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत.

 पनवेल : पनवेल महापालिकेने कोरोनाबाधित क्षेत्र घोषित केलेल्या खारघर सेक्टर १५ मधील घरकुल सोसायटीतील रहिवाशांचा लगाम ओढत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी तिकडे जाणारे रस्ते बंद केले आहेत. मोकाट फिरणाऱ्यांसाठी तिसरा डोळा उघडून पाच पोलिसांची नियुक्तीही केली आहे. घरकुल सोसायटीमधील ४ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यानंतर महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी तो परिसर कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित केला. त्या परिसराला सील करण्यात आले. खबरदारी घेत फवारणी ही केली. मात्र तेथील नागरिकांनी लॉकडाऊन आणि महापालिकेच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कुत्रे फिरवण्यापासून ते मोटरगाडीने फेरफटका मारण्याची स्पर्धा सुरूच ठेवल्याने खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  प्रदीप तिदार यांनी घरकुलकडे जाणारे रस्ते आता सील केले आहेत.घरकुल  सोसायटीचा परिसर विस्तीर्ण पसरलेला असल्याने बाहेर पडताना तेथील नागरिक गाडी घेऊनच जात असतात. त्यांना नियंत्रण घालण्यासाठी सगळीकडे बॅरिकेट्स लावले आहेत. त्याशिवाय पाच पोलिस कर्मचारी  तैनात केले असल्याची माहिती प्रदीप तिदार यांनी दिली.घरकुल आणि खारघर परिसरात सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर यांनी बजावलेल्या आदेशाचे उल्लंघन करून कोणी गाडी फिरवत असताना  आढळले तर वाहन जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.