चार महिने हातांना काम नाही, चक्रीवादळामुळे नुकसान – संसाराचा गाडा कसा हाकणार हा चाकरमान्यांसमोर प्रश्न

सुतारवाडी : मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर रोजंदारी करणाऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वी तसेच लॉकडाऊन झाल्यानंतर काही दिवसांनी ग्रामीण भागातील

सुतारवाडी : मार्च महिन्यात लॉकडाऊन झाल्यानंतर रोजंदारी करणाऱ्यांना मोठ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. लॉकडाऊन होण्यापूर्वी तसेच लॉकडाऊन   झाल्यानंतर काही दिवसांनी ग्रामीण भागातील नागरिकांनी हजारो संख्येने आपल्या गावाकडे कुटुंबासह धाव घेतली. कोणी चालत आले तर कोणी खाजगी गाड्यांना वाजवीपेक्षा जास्त पैसे मोजून आपला गाव गाठला. तेव्हापासून गेले चार महिने कोरोनामुळे हाताला काम नाही पोटाला पुरेसे अन्न नाही अशी अवस्था मोलमजुरी करणाऱ्यांची झालेली असताना ३ जूनला  निसर्ग चक्रीवादळाने थैमान घालून अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. मजुरी करणाऱ्यांची चिंता वाढली. एकतर काम नसल्यामुळे हातात पैसा नाही. मग घरावरचे उडालेले पत्रे आणणार कुठून, मोडलेला संसार कसा उभा करायचा असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडलेला आहे. नुकसान झालेल्याचे फॉर्म भरून घेतले परंतु भरपाई शासन कधी देणार तोपर्यंत उघड्यावरच मुला बाळांसह राहायचे का असा प्रश्न कुटुंब प्रमुखाला पडला आहे. मुंबई सोडून चार महिने झाले तेथे रोजीरोटी उपलब्ध होती. मात्र कोरोनामुळे सर्वत्र बंद असल्यामुळे गावाकडे नाईलाजाने परतावे लागले. गावाकडे काम कोण देणार ! काही दिवसांनी शाळा सुरू होणार. मुलांसाठी वह्या,  दप्तर, छत्री तसेच अन्य शालेय वस्तू खरेदी कशा करायचा असा मोठा प्रश्न नागरिकांना पडला आहे. घरांचे झालेले नुकसान,  घरावरील उडालेले पत्रे,  दुकानदार उधार देणार नाही मग भर पावसाळ्यात शासनाची मदत येईपर्यंत राहणार कुठे खाणार काय ? आता अन्नधान्य देणाऱ्यांचा ओघ मावळला आहे. अशा परिस्थितीत घर कसे चालवायचे असा प्रश्न अनेकांना पडलेला आहे. मुंबई पूर्ववत झाल्याशिवाय जाता येणार नाही. तोपर्यंत काय करणार या मोठ्या विवंचनेमध्ये सध्या ग्रामीण भागातील हजारो नागरिक आहेत.