तळा तालुक्यातील चरई खुर्द येथील जंगलात बिबट्याची दहशत

तळा: तळा तालुका हा दुर्गम तालुका असून वनखात्याच्या जमिनीने चहुबाजूंनी वेढलेला आहे. जवळच फणसाड अभयारण्य असल्याने  कित्येकदा वन्य प्राण्यांचे दर्शन घडते. तळा तालुक्यातील चरई खुर्द येथील जंगलात सध्या बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्याने गावातील शेतकऱ्याच्या बोकडाचा फडशा पाडला आहे. चरई येथील शेतकरी मंगेश तांबे यांचे बोकड व बकऱ्या नेहमी प्रमाणे त्यांचा गुराखी महादेव पवार हा गोठण माळावर चरायला घेऊन गेला असता सायंकाळी पाचच्या दरम्यान पवार हे झाडाखाली बसले असताना बकऱ्यांचा कळप  ओरडत त्यांच्या दिशेने आला.

काय झालं म्हणून पवार हे बघण्यासाठी गेले असता बिबट्या बोकडाच्या नरड्याचा घोट घेत असल्याचे त्यांनी पाहिले जवळ कोणीही नसल्याने त्यांनी आरडाओरड करताच बिबट्या बोकडाला तिथेच टाकून जाळीत निघून गेला तसेच शेतकरी जयवंत शिंदे यांच्या गायीचे लहान वासरु देखील मानेला सुळे लागलेल्या जखमी अवस्थेत आढळून आले. बिबट्याने वासराला आपले भक्ष्य बनविले होते मात्र जवळच असलेली गाय त्याच्यावर धावून गेल्याने बिबट्याने वासराला त्याच अवस्थेत सोडून पळ काढला असावा असा अंदाज गावातील शेतकऱ्यांकडून लावला जात आहे. एकंदरीत बिबट्याच्या दहशतीमुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेहमी प्रमाणे सकाळी ११ च्या दरम्यान बकऱ्या चरायला सोडून दिल्या संध्याकाळी पाच च्या दरम्यान बकऱ्यांचा कळप ओरडत आल्याने बघायला गेलो तर बिबट्याने बोकडाला पकडल्याचे दिसले.मी आरडाओरडा करताच बोकडाला टाकून बिबट्या जाळीत पळून गेला.

– महादेव पवार, गुराखी