म्हसळा बाजारपेठेत गर्दी आटोक्यात आणण्यास स्थानिक प्रशासन अपयशी

म्हसळा : शनिवारपासून सुरू होणार्‍या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हसळा बाजारपेठेमध्ये उत्सवासाठी लागणार्‍या फळे, आरास, शोभेच्या वस्तु खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये नागरिकानी एकच गर्दी केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे या गर्दी मध्ये शासनाचे निकष धाब्यावर ठेवत लहान मुलांपासून वयोवृद्ध माणसे देखील विनामास्कने म्हसळा बाजाररपेठेत मुक्त संचार करत होते.

उद्यापासून (शनिवारी) गणेशोत्सवाच्या सुरवात होत असून हा उत्सव हिंदू धर्मामध्ये महत्वाचा मानला जातो. या उत्सवाला कोकणामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबई,पुणे व देश विदेशातून अनेक भाविक आपल्या गावी येत असतात.मात्र कोरोंना प्रादुर्भावमुळे काही प्रमाणात शासनाचे यावर्षी या उत्सवासाठी बंधने लादले असले तरी नागरिक त्या बंधनांना जुगारून सर्रास पणे ठरवलेल्या नियमांची पायमल्ली करून बाजारपेठेमध्ये खरेदी करताना दिसत होते.

म्हसळा बाजारपेठेमध्ये शुक्रवारी गणेशोत्सवाच्या खरीदेसाठी तालुक्यातील ८३ खेडेगाव व वाड्यांवरील नागरिकानी एकच गर्दी केली होती. दिवसेंदिवस कोरोंना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,जिल्हाधिकारी रायगड यांनी गणेशोत्सवासाठी येणार्‍या चाकरमण्यानसाठी एक नियमावली तयार केली होती. मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत पोलिस प्रशासन वगळता म्हसळा नगरपंचायत व स्थानिक प्रशासन बाजारातील गर्दी आटोक्यात आणण्यात कोणत्याही प्रकारे प्रयत्न केले नसल्याने म्हसळा तालुक्यात सणासुधीच्या काळातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्हा प्रशासनाच्या नियमांनुसार १२ तारखे नंतर येणार्‍या नागरिकानी आपली कोविड १९ ची चाचणी करून जिल्ह्यात प्रवेश करावयाचा होता. मात्र या नियमाची देखील पायमल्ली करीत अनेक नागरिक खाजगी वाहनाने जिल्ह्यात प्रवेश करून गणेशोत्सवाच्या खरेदीकरिता बाजारपेठेत विना मास्क व सोशिअल डिस्टन्सिंगचे पालन न करता मुक्त संचार करीत आहेत.