लॉकडाऊनमुळे बिघडली आर्थिक घडी, रायगड जिल्ह्यातील अनेक उद्योगधंदे संकटात

प्रणय पाटील, अलिबाग : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन, संचारबंदी करण्यात आले आहे. याचा मोठा परिणाम पर्यटन, शेती, मासेमारी सह इतर छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांवर झाला

 प्रणय पाटील, अलिबाग : कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन, संचारबंदी करण्यात आले आहे. याचा मोठा परिणाम  पर्यटन, शेती, मासेमारी सह इतर छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांवर झाला असून, रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य नागरिकांची आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे.

लांबलेला पाऊस त्यांनतर समुद्रात निर्माण झालेली वादळे तसेच सध्या आलेले कोरोना विषाणू संसर्गाचे संकट यामुळे जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. या ना त्या कारणाने मच्छिमारांना आपल्या बोटी समुद्र किनारी नांगरुन ठेवाव्या लागत होत्या. कोरोना प्रादुर्भाव पार्श्र्वभूमीवर मासळीला ग्राहक मिळत नसल्याने मछिमारांना बोटी नांगरुन ठेवाव्या लागत आहेत. ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आले असले तरी त्यांनतर लॉक डाऊन उठेल की नाही याबाबत सर्वांच्या मनात साशंकता आहे. तसेच जून व जुलै महिन्यात दरवर्षी सरकारकडून खोल समुद्रात मासेमारीला बंदी करण्यात येते. यामुळे कोरोना नंतर मासेमारी बंदिचे मच्छिमारांना टेन्शन आहे. यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या मच्छिमारांसमोर नवीन संकट उभे ठाकणार आहे.
 
जिल्ह्यात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. लॉकडाऊन तसेच संचारबंदी काळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकरी हे आपल्या शेतात लागवड केलेल्या भाजीपाला मुंबई तसेच नवी मुंबई बाजारपेठांमध्ये न पाठविता आजूबाजूच्या गावांमध्ये विकण्यास प्राधान्य देतात. मात्र सध्या कोरोना विषाणू प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर अनेक गावांमध्ये आपल्या गावातील नागरिकांव्यतिरिक्त इतर गावातील नागरिकांना येण्यास गावकरी विरोध करीत आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. तसेच सध्या हापूस आंबा  सिजन सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील आंबा देशासह परदेशातही विकला जातो. मात्र सध्या आंबा तयार असूनही विकण्यासाठी पाठविता ये नाही, यामुळे बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे.
 
शेतीनंतर रायगड जिल्ह्यात पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. पर्यटन पूरक व्यावयावर जिल्ह्यातील हजारो कुटुंब आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भाव पार्शवभूमीवर जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. परिणामी पर्यटन व्यवसाय पूर्णपणे ठप्प आहे. हॉटेल, लॉज, कॉटेज, खानावळी, समुद्री खेळ यावर आधारित सर्व व्यवसाय बंद आहेत. याचा फटका या व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबांना बसला आहे.
 
मार्च ते एप्रिल महिना लग्न सोहळे सिजन आहे. मात्र कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करण्याच्या सूचना आहेतं यामुळे लग्न सोहळे रखडले आहेत. अनेकांनी आपल्या लग्नांच्या ठरलेल्या तारखा रद्द केल्या असून, कोरोना संकट टळल्यानंतर लग्न सोहळे करण्याचे निर्णय त्यांनी घेतले आहेत. यामुळे निमंत्रण पत्रिका, हॉल, कॅटथस, मंडप, स्पीकर, बेंजो, व्हिडिओग्राफी, फोटोग्राफी यासह इतर अनेक व्यवसायांवर परिणाम झाला असून, याची झळ हजारो कुटुंबांना बसली आहे.
 
जिल्ह्यात बांधकाम, वीटभट्टी यासह अनेक व्यवसाय व कंपन्यांमध्ये रोजंदारीवर काम करणारे हजारो कामगार आहेत. सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊनमुळे हे व्यवसाय बंद असून, या कुटुंबांचे उत्पन्नच थांबले आहे. यामुळे ही कुटुंब आर्थिक विवंचनेत सापडली असून, यापुढे घरखर्च कसा करायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.