लोणेरेमधील विद्यापीठाला शास्त्रींची नव्हे मेस्त्रींंची गरज – घोसाळकर

महाड:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,(batu) लोणेरे हे विद्यमान कुलगुरूंच्या निष्क्रीयतेमुळे बंद होण्याच्या मार्गावर असून कुलगुरूंच्या हुकूमशाहीला विद्यापीठातील सर्व कर्मचारी,परिसरातील प्रकल्पग्रस्त,बेरोजगार व छोटे ठेकेदार संतप्त झाले आहेत. इतकेच काय पण बिल्डिंगची अवस्थाही खराब आहे त्यामुळे विद्यापीठाला शास्त्रीची नव्हे तर चांगल्या मेस्त्रीची गरज असल्याचा घणाघात स्थानिक नेते, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर(pramod ghosalkar यांनी केला आहे.

गेले सहा महिने कुलगुरू कार्यालयात येत नाहीत. विद्यार्थांच्या हिताचे निर्णय वेशीवर टांगत कोरोनाचा बागुलबुवा कुलगुरू किती दिवस करणार आहेत?, असा संतप्त सवाल विद्यापीठ प्रशासनालाच पडला आहे. एकिकडे कुलगुरू हजेरी लावत नाहीत तर दुसरीकडे विद्यापीठाला कायमस्वरूपी कुलसचिव नाहीत. एका वर्षात पाच वेळा कुलसचिव बदलले आहेत. ते देखील कायमस्वरूपी नसल्याने पुणे मुंबईत राहून कारभार संभाळतात.

विद्यापीठात कुलसचिव, ज्युनियर इंजिनियर, शाखा अभियंता, वित्त अधिकारी, परिक्षा नियंत्रक अशा अनेक महत्त्वाच्या नियुक्त्या गेली १५ वर्षे रिक्त आहेत. स्थानिकांच्या जमिनी कवडीमोल भावाने विद्यापीठासाठी घेतल्या खऱ्या परंतु त्या जागेचा वापर योग्य रितीने विद्यापीठ प्रशासनाकडून होताना दिसत नाही. स्थानिकांना कायम नोकरी मिळावी यासाठी विद्यापीठाकडून प्रयत्न होताना दिसत नाहीत. रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी यांना दर तीन महिन्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवले जाते व रोजंदारी कर्मचाऱ्यांना विद्यापीठाच्या कामासाठी कमी व वैयक्तिक कामासाठी जास्त राबवल्याची तक्रार नेहमी होत असते. वित्त अधिकारी हे छोटे छोटे सुशिक्षित अभियंते व इतर काम करणारे लोक यांना काम न देता ॲानलाईन  विद्यापीठाला लागणाऱ्या गोष्टी खरेदी करत असल्याने परिसरातील छोट्या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

याआधी कुलगुरूपदी देशपांडे, कुलकर्णी, मानकर यांनी त्यांच्या काळात शिक्षणाचा दर्जा चांगल्या प्रकारे उंचावला होता त्यामुळे देशभरातून लोणेरे येथे शिक्षणासाठी विद्यार्थी येत होते. विद्यापीठ ॲडमिशनसाठी विद्यार्थांमध्ये मेरीट साठी मोठी चढाओढ होताना दिसत होती. विद्यापीठामध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळायचे परंतु गेली काही वर्षे अॅडमिशनचा कोटा देखील पूर्ण होताना दिसत नाही याला जबाबदार प्रशासन आहे.

विद्यापीठाच्या स्थापनेनंतर विद्यापीठ प्रशासनाने बिल्डींगच्या मेंटेनन्सची कामे देखील योग्य वेळी केली नसल्याने बिल्डिंग जीर्ण अवस्थेत झाल्या आहेत तर अर्ध्याहून जास्त इमारतीचा उपयोग होत नसल्याने इमारत पडण्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळेच विद्यापीठाला शास्त्रीची नव्हे तर चांगल्या मेस्त्रीची गरज असल्याचा घणाघात स्थानिक नेते, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी केला आहे. तसेच करोनाच्या महामारीत विद्यापीठ प्रशासनाने टेम्पररी कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याने सुशिक्षित बेरोजगरांवर उपासमारीची वेळ आली होती. त्याकडे देखील विद्यापीठ प्रशासनाने पद्धतशीरपणे दुर्लक्ष केले होते.

विद्यापीठाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये जर विद्यापीठ प्रशासनाने सुधारणा केली नाही तर स्थानिकांचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत , उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना भेटणार असून कुलगुरूंना सक्तीच्या रजेवर पाठवून विद्यापीठावर प्रशासक नेमावा अशी मागणी करणार असल्याचे प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले.