corona

दुसर्‍या कोरोना लाटे प्रकरणी(corona second wave) महाडकर नागरिकांची संदिग्ध अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान येणार्‍या कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी महाड(mahad) तालुका आरोग्य यंत्रणा सज्ज असून जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाड : गेल्या आठ दिवसांत तीन दिवस प्रत्येकी एक दोन कोरोना रूग्ण आढळुन येणाऱ्या महाडमध्ये ही महामारी महाडकरांची पाठ सोडेना अशा प्रतिक्रिया आता सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहेत. दुसर्‍या कोरोना लाटे प्रकरणी(corona second wave) महाडकर नागरिकांची संदिग्ध अवस्था झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान येणार्‍या कोणत्याही संकटाला सामोरे जाण्यासाठी महाड(mahad) तालुका आरोग्य यंत्रणा सज्ज असून जनतेने प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाड तालुक्यात १० ऑक्टोबरनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली घट ही नागरिकांना दिलासा देणारी ठरली आहे. दिवाळीमध्येदेखील सालाबादप्रमाणे जोशात साजरी न करता महाडकर नागरिकांनी आपल्या उत्साहावर नियंत्रण ठेवत हा पवित्र सण उत्साहात साजरा केला.
शासकीय यंत्रणेने दिवाळीदरम्यान होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव गतिमान पद्धतीने होण्याची शक्यता वर्तविली होती. मात्र आज दिवाळीनंतर आठ दिवसांनी शासकीय स्तरावरून देण्यात आलेल्या माहितीमध्ये रुग्णांची संख्या कमी असली तरी खाजगीरीत्या अनेक रुग्ण संबंधित फॅमिली डॉक्टराकडुन या संदर्भात उपचार घेत असल्याचेही आढळून आले आहे यामुळे कोरोना महाडकरांची पाठ सोडेना, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

सद्यस्थितीमध्ये आजपावेतो महाड तालुक्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १७९७ एवढी होती. यापैकी १७१६ रूग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले दुर्दैवाने या नऊ महिन्यांमध्ये महाड शहर व तालुक्यातील अनेक मान्यवरांसह विविध क्षेत्रातील ७४ जणांना या महामारीमध्ये मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तर उर्वरित रुग्णांवर महाड डेडिकेटेड कोविड सेंटर औद्योगिक वसाहतीमध्ये उपचार सुरू आहेत.

शासनाने दिवाळीपश्चात पर्यटन क्षेत्रासह परिवहन क्षेत्रातही प्रवासाकरिता खुली सूट दिल्याने गेल्या नऊ महिन्यांच्या बॅकलॉग दिवाळी दरम्यान मिळालेल्या सुट्टीचा लाभ घेत हजारो पर्यटकांनी कोकणातील विविध ठिकाणी भेटी देऊन साजरा केला.

यादरम्यान स्थानिक प्रशासनाकडून संबंधित नागरिकांना कोरोना महामारीचे संकट लक्षात ठेऊन शासकीय निर्देशाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. तथापि दिवाळीपश्चात आज आठ दिवसांनंतरदेखील रुग्णांची संख्या ही शासकीय नोंदीप्रमाणे पाचच्या आतमध्येच राहिल्याने दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढण्याची वर्तवलेली शक्यता आजपावेतो फोल ठरल्याचे दिसून येते.

केंद्र शासनाकडून आरोग्य विभागाला कोरोना संबंधातील लसीकरणाबाबत तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मागील दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तीन ठिकाणी यासंदर्भात दिलेल्या भेटीनंतर नागरिकांमध्ये या लसीबाबतची उत्सुकता वाढू लागली आहे. एकूणच लसीकरण येत्या काही महिन्यांमध्ये येईल हे लक्षात घेतले तरीही त्यापूर्वीपर्यंत शासनाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन सर्व जनतेने करावे,असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांना केले जात आहे.