महाड नगरपालिकेकडून या धोकादायक इमारती व घरांना नोटीस

महाड: तारीक गार्डन इमारत दुर्घटनेनंतर महाड(mahad) नगरपालिकेने अतिधोकादायक इमारती(dangerous building) विरोधात सुरू केलेली मोहीम आता वेगात सुरू झाली असून शहरातील नव्याने पाहण्यात आलेल्या २३ इमारती व घरांना महाड नगरपालिकेने नोटिसा(notice) बजावल्या असल्याची माहिती नगर अभियंता  सुहास कांबळे यांनी दिली आहे.
ऐतिहासिक महाड नगरपालिकेमधील या अतिधोकादायक इमारती संदर्भात महाड पालिका प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीची माहिती देत असताना सुहास कांबळे यांनी स्पष्ट केले की, मागील दहा दिवसात नगरपालिकेने नियुक्त केलेल्या यासंदर्भातील विशेष पथकाकडून ३०४ इमारतींपैकी १७३ इमारतीना तातडिने पालिकेमार्फत स्ट्रक्चर ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या अतिधोकादायक इमारतींपैकी पहिल्या २३ इमारती व घरांना महाड नगरपालिका बांधकाम विभागामार्फत नोटिसा बजावण्यात आल्याचे कांबळे यांनी सांगितले .

या अतिधोकादायक इमारती व घरांमध्ये शेडगे बिल्डिंग आम्रपाली हॉटेल , जयश्री पाटील काजळ पुरा , मालती शिंदे शिवदे बिल्डिंग , दिलीप बुटाला, कांबळे गवळ आळी , विजय सुर्वे परिट आळी , मनोहर वरणकर परिट आळी ,नंदकुमार जोशी मधली आळी ,धनंजय  तलाठी मधली आळी ,व्ही चंद्रकांत एम.जी रोड महाड, रुचिरा हॉटेल एमजी रोड, महाड इंगवले बिल्डिंग आदर्शनगर ,अध्यक्ष त्रिशूल बिल्डिंग कोट आळी , अध्यक्ष स्नेहा गृह निर्माण संस्था नवेनगर, डॉक्टर शेख क्लिनिक सुलतान गल्ली ,अध्यक्ष हवा कॉम्प्लेक्स पानसरी मोहल्ला, अ.हमीद मो.मुकादम कोट आळी, सुरेंद्र टिपणीस गवळ आळी, राजेश शिवदे भोई आळी, मिलिंद शिरगावकर मधली आळी ,शरद मपारा तांबट आळी ,शेख जमोद्दीन लियाकत अधिकारी साळीवाडा नाका , सादिक जलाल चवदार तळे, खुर्शीद फकीर साळीवाडा नाका यांचा समावेश असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे .

यानंतर क्रमाक्रमाने नगरपालिका प्रशासन उर्वरित अतिधोकादायक इमारतींना देखील अशाच पद्धतीच्या नोटिसा बजावणार असून त्यांना संबंधित इमारतींच्या सुरक्षिततेसंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात येणार आहे. या अति धोकादायक इमारती शिवाय दुरुस्ती व डागडूजी करण्याची आवश्यकता असणार्‍या इमारतींची संख्या ही शंभरपेक्षा जास्त असून या इमारतीसंदर्भात नगरपालिका बांधकाम विभाग योग्य मुदतीमध्ये निर्णय घेईल असे संकेत दिले .

एकूणच २४ ऑगस्टच्या दुर्घटनेनंतर महाड नगरपालिका हद्दीमधील बेकायदेशीर व अनधिकृत बांधकामविरोधात पालिकेची मोहीम मागील काही वर्षांपेक्षा अधिक वेगाने व नियोजनबद्ध पद्धतीने सुरू झाल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे .