महाड एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण, प्रशासनाचे दुर्लक्ष

महाड: महाड औद्योगिक वसाहतीमधील मुख्य रस्त्यांची(mahad midc road) चाळण झाली असून हे रस्ते आता कामगार व त्यांचे नातेवाईक तसेच कोविड रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांसाठी यमदूत ठरत आहेत. दरम्यान या मुख्य मार्गावरील खड्ड्यांच्या दुरुस्तीकरिता एमआयडीसीकडून दुर्लक्ष होत असून या नादुरूस्त रस्त्यांमुळे अपघात झाल्यास मोठा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे .
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण केलेल्या डेडिकेटेड कोविड सेंटर येथे नांगल वाडीपासून पोहोचण्याकरता ३ किलोमीटर अंतरासाठी सुमारे वीस मिनिटांचा कालावधी लागत आहे. कोरोना रुग्णांकरिता तसेच नातेवाईकांना रात्री अपरात्री येताना हा रस्ता धोक्याचा बनत चालल्याची तक्रारी करून देखील एमआयडीसी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली आहे .
महाड एमआयडीसी ते कोविड सेंटर हे अंतर सुमारे ४ किलोमीटर लांबीचे आहे .मात्र या मार्गावरील अनेक ठिकाणी रात्रीचे पथदिवे देखील नादुरुस्त असून बंद असल्याने हा रस्ता आता सर्वसामान्यांसाठी यमदूत ठरत आहे .
या रस्त्यासंदर्भात औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केल्यास वारंवार होणारा मुसळधार पावसाने खड्डे बुजवणे अडचणीचे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. पाऊस उघडताच तातडीने या नादुरुस्त रस्त्यांची दुरुस्तीही योग्य पद्धतीने केली जाईल, असे सांगण्यात आले आहे.
वसाहतीच्या या मुख्य मार्गावरून प्रतिदिनी किमान तीन ते चार हजार वाहने वाहतूक करित असून यांमध्ये मोठ्या ट्रेलरचादेखील समावेश आहे. अनेक कंपन्यांमधुन सुरू असलेल्या कामांकरिता या अवजड वाहतूक करणाऱ्या गाड्यांचा देखील या मार्गावरून प्रवास होत असल्यानेही रस्त्याची नादुरुस्ती या अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी कामगार वर्गातून केल्या जात आहेत .
एकूणच एकीकडे महाड उत्पादक संघटना कोट्यवधी रुपये खर्च करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता कोविड सेंटरची निर्मिती करीत असतानाच एमआयडीसी मात्र या मार्गावरील दुरुस्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप केला जात आहे. कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या नागरिकांना या सेंटरमधून उपचारासाठी येणे जाणे हे देखील एक मोठे संकट झाले असल्याने एमआयडीसीने या नादुरुस्त रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे .