mahad nagar parishad new building
महाड नगर परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत

महाड(mahad) नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन असे नाव देण्याचा निर्णय महाड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज सर्वानुमते घेण्यात आला.

महाड: महाड(mahad) नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीला श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन असे नाव देण्याचा निर्णय महाड नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये आज सर्वानुमते घेण्यात आला. याच बरोबर शहरातील अनधिकृत बांधकामे, इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, चवदार तळे सुशोभीकरण, शहरातील पाणी प्रश्न आदी विषयांवरही पालिकेच्या सभेत चर्चा करण्यात आली.

महाड शहरातील छत्रपती शिवाजी चौकामध्ये महाड नगरपालिकेची प्रशस्त इमारत उभी राहत असून या इमारतीला श्री छत्रपती शिवाजी महाराज भवन नाव देण्याचा निर्णय नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी सभेमध्ये जाहीर करताच या निर्णयाचे टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी छत्रपती शिवरायांच्या भूमीत असलेल्या या प्रशासकीय इमारतीला त्यांचे नाव दिले जात असल्याबाबत नगराध्यक्षांचे खास अभिनंदन केले.

छत्रपतींच्या शिवरायांच्या नावाच्या या प्रशासकीय भवनातून महाड शहरातील नागरीकांना चांगली सेवा देण्यासाठी आपण वचनबद्ध राहू असेही संदीप जाधव यांनी स्पष्ठ केले. स्नेहल जगताप यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तारिक गार्डन इमारतीच्या दुर्घटनेनंतर शहरातील इमारतींची सद्यस्थिती व त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट झाले आहे का ? याबाबतचा मुद्दा अनेक नगरसेवकांनी उचलून धरला.

यावेळी शहरातील धोकादायक असणाऱ्या २५ इमारतींना नोटिसा देण्यात आल्या असुन धोकादायक असलेल्या इमारतींनी त्यांची तातडीची दुरुस्ती करून घ्यावी याबाबत पालिकेची कार्यवाही सुरू असल्याचे नगर अभियंता सुहास कांबळे यांनी सांगितले.

यावेळी उपनगराध्यक्ष संदीप जाधव, नगरसेवक वजीर कोंडीवकर , चेतन सुर्वे, सुनिल कविस्कर, भाग्यश्री फुटाणकर, दीपक सावंत ,सुनील अगरवाल व विरोधी पक्ष नेता चेतन पोटफोडे यांनी या विषयावर चर्चा शहरातील अनधिकृत बांधकामाचा प्रश्न पालिका सभेमध्ये गाजला यावर नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी अनधिकृत बांधकामाबाबत कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही तसेच शहरातील सर्व इमारतींची पाहणी देखील केली जाईल असे स्पष्ट आदेश दिले.

पानसरे मोहल्लात निर्माण होत असणारी पाणीटंचाई हा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. पाण्यासाठी नागरिक नळाला मोटार लावतात त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. चवदार तळे सुशोभीकरणाचा सुधारित आराखडा तयार करण्याबाबत या सभेमध्ये चर्चा झाली तसेच आरक्षण क्रमांक ५९ उठवण्याबाबत महाड प्रांताधिकारी यांनी दिलेल्या पत्राबाबत विचार विनिमय करण्यात आला व या सभेत सर्वानुमते हा प्रस्ताव फेटाळून लावला या सभेमध्ये सुधारित बांधकाम नियमावली व सरकारी पत्रव्यवहाराचे वाचन करण्यात आले.

वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी शहरांमध्ये नो पार्किंग चा फलक लावलेले असून आता पोलिसांकडून कारवाई केली जाईल असे सांगितले. या सभेला मुख्याधिकारी जीवन पाटील ,उपनगराध्यक्ष संदीप जाधव ,नगर अभियंता सुहास कांबळे सर्व विभाग प्रमुख, सर्व सभापती व नगरसेवक उपस्थित होते.