महाडमध्ये कायमस्वरूपी एनडीआरएफचा तळ कार्यरत करणे गरजेचे : माणिक जगताप

महाड (Mahad) येथे एनडीआरएफचा (NDRF) तळ स्थापन करण्याची मागणी माजी आमदार (Former MLA) आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांनी केली असून त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना दिले आहे

महाड : नैसर्गिक आपत्तीचा महाड (Mahad) आणि पोलादपूर (Poladpur) तालुक्याला असलेला कायमस्वरूपी धोका विचारात घेता, महाड येथे एनडीआरएफचा (NDRF) तळ स्थापन करण्याची मागणी माजी आमदार (Former MLA) आणि रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांनी केली असून त्याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांना दिले आहे. महाड आणि पोलादपूर हे दोन्ही तालुके नेहमीच नैसर्गिक आपत्ती (Natural disaster)चा सामना करीत आले आहेत.

सन २००५ मध्ये या दोन्ही तालुक्यात दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी सह प्राणहानी झाली होती. लष्कराच्या मदतीने त्यावेळेस या दोन्ही तालुक्यात शोध व बचाव कार्य करण्यात आले होते. त्याच काळात राज्यात आणि देशात अनेक ठिकाणी आशा दुर्घटना घडल्यानंतर एनडीआरएफचा शोध आणि बचाव पथकाची स्थापना करण्यात आली. आजवर झालेल्या विविध दुर्घटनेमध्ये एनडीआरएफची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यांना नैसर्गिक आपत्तीचा कायमस्वरूपी धोका आहे.

या तालुक्यातील अनेक गावे दरडप्रवण ठरविण्यात आली असून दरडीची टांगती तलवार कायम आहे. महाड शहर आणि परिसराला दरवर्षी पुराचा धोका निर्माण होत असतो दुर्घटना घडल्यानंतर शोध आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफला पाचारण करायचे झाल्यास त्यांना महाड येथे पोहचण्यास विलंब लागतो ही बाब आणि दोन्ही तालुक्यांना असलेला कायमस्वरूपी धोका विचारात घेता, महाड येथे एन डी आर एफ चा तळ स्थापन करण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा अशी मागणी श्री जगताप यांनी केली आहे.