
करणी दूर करण्यासाठी जादूटोणा करण्याच्या बहाण्याने एका वृद्धेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन वासुदेवांना महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४३ हजार ७०५ रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. महाड शहरात अनेकांना या दोघांनी पाचशे रुपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.
महाड : करणी दूर करण्यासाठी जादूटोणा करण्याच्या बहाण्याने एका वृद्धेची आर्थिक फसवणूक करणाऱ्या दोन वासुदेवांना महाड शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून ४३ हजार ७०५ रुपयांची रोख रक्कमही जप्त करण्यात आली. महाड शहरात अनेकांना या दोघांनी पाचशे रुपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत गंडा घातल्याचा पोलिसांना संशय आहे.
लखन गौड (३५, रा. जळोची, ता. बारामती) आणि ज्ञानेश्वर गंगवने (मेळद ता. बारामती) अशी या दोन भामट्यांची नावे आहेत.
वासुदेवाचा वेश परिधान करून भिक्षा मागण्याच्या निमित्ताने ते प्रभात कॉलनी परिसरातील एका वृद्धेच्या घरात गेले. तेथे भविष्य सांगण्याचा बहाणा करत, तुझ्यावर करणी करण्यात आली आहे असे त्यांनी या महिलेला सांगितले.
जादूटोणा करून आम्ही ही करणी दूर करतो असे सांगत त्यांनी या महिलेकडून तीन हजार रुपये उकळले. तर या महिलेच्या शेजारी राहणाऱ्यांपैकी एकाकडून सहाशे रुपये तर दुसऱ्याकडूनही काही रक्कम उकळली.
या महिलेचा जावई दीपक पवार याला हा प्रकार समजल्यानंतर त्याने महाड शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी महाड बाजारपेठेतून या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक व्ही.व्ही. शिंदे हे करित आहेत. या दोघांनी शहरात अनेकांची फसवणूक केली आहे. ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांनी महाड शहर पोलीस ठाणे (दूरध्वनी क्र. ०२१४५ – २२२१४९ ) किंवा ९१६७९१२१९९ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरिक्षक शैलेश सणस यांनी केले आहे.