रायगडमधून महाराष्ट्रासह छत्तीसगडलाही मिळणार ऑक्सिजन

पनवेल : रायगडमधून संपूर्ण महाराष्ट्र आणि छत्तीसगड या राज्याला ऑक्सिजनचा पुरवठा(oxygen supply) केला जात असताना रायगडमध्येच(raigad) ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत असल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी पालकमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त केल्यावर संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला काम करायचे असून आपणच त्यांना ऑक्सिजन पुरवूया, असे मत पालकमंत्री आदिती तटकरे(aditi tatkare) यांनी व्यक्त केले.

कोविड रूग्णांना दिवसेंदिवस ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेडची भासणारी कमतरता दूर करण्यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी संबंधितांची ऑनलाईन बैठक १५ सप्टेंबर रोजी आयोजित करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश दिले होते. त्यावेळी रायगडमध्ये रुग्णालयांत ऑक्सिजनचा तुटवडा होत असल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागत असल्याचे दिसून आले आहे. हा विषय अतिशय गंभीर असल्याचे संघर्ष समितीचे अध्यक्ष कांती कडू यांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून खासगी डॉक्टरांनी त्यांच्याशी संपर्क साधावा असे सांगून रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूर आणि पेण या तालुक्यांमध्येच ऑक्सिजन तयार करणारे कारखाने असून छत्तीसगड या राज्यालाही आपण ऑक्सिजन पुरवित असल्याची माहिती दिली.

पालकमंत्री आदिती तटकरे यांनी रायगड आणि कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला काम करायचे असून आपणच त्यांना ऑक्सिजन पुरवूया, असे मत व्यक्त करून यापुढे पनवेलसह रायगड जिल्ह्यात ऑक्सिजनचा समतोल पुरवठा करण्यात येईल . त्यामुळे खासगी रुग्णालयात आणि कोविड रूग्णांना मोठा दिलासा मिळेल, असेही सांगितले.