mahavitran

पनवेल : कोविड-१९ महामारीने थैमान घातलेले असताना अशा कठीण परिस्थितीत महावितरणमधील (mahavitaran) सर्व अभियंते(engineers) कोविड सेंटर/हॉस्पिटल्स व विलगीकरण कक्ष तसेच सर्वच ग्राहकांना अखंडितपणे वीजपुरवठा करण्याचे काम जीव जोखमीत घालून करीत आहेत. काही अभियंते तर कर्तव्य बजावत असताना कोरोनाग्रस्त झाले असून ,काही अभियंत्यांचा कोरोनामुळे अंत झाला आहे. सर्व अभियंते व एस ई ए संघटना प्रशासनास प्रत्येक गोष्टीत सर्वतोपरी सहकार्य करीत आहेत. मात्र महावितरण प्रशासन अभियंत्यांच्या प्रश्नांबाबत कमालीचे उदासीन असल्यामुळे अभियंत्यांच्या मनात प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे सबोर्डीनेट इंजिनियर्स असोसिएशन(ubordinate engineers association) आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार ,प्रशासनाने १५% बदल्यांचे परिपत्रक काढल्यानंतरही महावितरण प्रशासनाने मात्र फक्त जेई ते एईईच्या बदल्यांना अजून मुहूर्त सापडत नसून असून तब्बल ऑक्टोबर तोंडावर आहे तरीसुद्धा अभियंत्यांची एकही विनंती बदली काढली नाही. उलटपक्षी कोविडसारखी भयावह परिस्थिती असतांना अनिवार्य रिक्त पदे ठेवण्याची अफलातून संकल्पना राबवली आहे. अनिवार्य रिक्त पदांमुळे ग्राहकांना सेवा देताना अडचणीचे ठरत आहे. दैनंदिन कामकाजातही अभियंत्यांवर अतिरिक्त ताण येणार असून दैनंदिन कामकाजावर विपरीत परिणाम होईल. महावितरण आधीच कठीण वित्तीय परीस्थितीतून जात असताना व क्षेत्रीय स्तरावर अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे, असे सबॉर्डीनेट अभियंता संघटनेने महावितरण प्रशासनाला वेळोवेळी सुचविले आहे. त्यावर उपायही सुचविले आहेत मात्र त्याकडे प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत असून मागील काही महिन्यांपासून बदली धोरणावर जास्त लक्ष केंद्रित करीत असून त्यातही अनिवार्य रिक्त पदे ठेवणारच अशी भूमिका घेत असल्याने सर्व अभियंत्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

एकीकडे कंपनीची आर्थिक परिस्थिती कठीण असताना संघटनेने वेळोवेळी महसूल वसुलीबाबत, इंपालमेंटमधील त्रुटी ई. बाबतीवर कशाप्रकारे मात करता येईल हे वेळोवेळी सुचविले आहे, मात्र हे महावितरण प्रशासन बदली या विषयावर विनाकारण वेळ वाया घालत असून संपूर्ण महाराष्ट्रातील सबोर्डीनेट इंजिनीयर्स असोसिएशनचे अभियंते आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. याबाबत महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री  डॉ नितीनजी राऊत याना भेटून निवेदन दिले असून सदर प्रलंबित प्रश्नाबाबत लक्ष देण्याची विनंती केली आहे. प्रशासनाने वेळीच तोडगा नाही काढला तर निषेध आंदोलन चालु करण्याचा विचारात संघटना आहे. मात्र आंदोलन करीत असतांना महाराष्ट्रातील कोणत्याही कोविड सेंटर/हॉस्पिटल्स/विलगीकरण कक्ष यांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही याची पुरेपूर दक्षता एस. ई. ए चे अभियंते घेणार आहेत.

महाराष्ट्रात कुठेही अनिवार्य रिक्त पदे न ठेवता सर्वच ग्राहकांना चांगल्या प्रकारे वीज सेवा मिळावी व विनंती बदलीच्या प्रतीक्षेत असलेले अभियंत्यांना त्यांच्या विनंती ठिकाणी बदली व्हावी ,कनिष्ठ अभियंता ते सहायक अभियंता पदोन्नती पॅनल त्वरित करावे ,उपकार्यकरी अभियंता म्हणून पदोन्नती झालेल्या अभियंत्यांना त्यांच्या पॅरेंट झोन मध्ये पदस्थपना द्यावी व संघटनेस विश्वासात घ्यावे, तसेच महापारेषण मध्ये प्रमोशन पॅनल व स्टाफ सेट अपचा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित असून ,प्रशासनाने अद्यापही सदर चे मुद्दे विचारात घेतले नाहीत ,महानिर्मिती मध्ये सुद्धा मेडिक्लेम पोलिसी मध्ये त्रुटी असून अनेकदा अडचणींना सामोरे जावे लागते,प्रमोशन पॅनल वेळेवर होत नाहीत ,तसेच महानिर्मितीची कमीत कमी ५०%वीज विकत घेण्याचे अनिवार्य करावे,ज्याची आवश्यक नाही अश्या कंत्राटी पद्धतीला लगाम घालावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तीनही कंपनीचे अभियंते कोविड परिस्थितीतही आंदोलन(protest) करतील असा निर्वाणीचा इशारा सबॉर्डीनेट इंजिनिर्स असोसिएशनचे सरचिटणीस अभियंता संजय ठाकूर यांनी दिला व त्यामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीस सर्वतोपरी तिन्ही कंपन्यांचे प्रशासन राहील असा इशारा सरचिटणीस संजय ठाकूर यांनी दिलेला आहे.