रोहे अष्टमी नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी महेश कोलाटकर यांची निवड

रोहा: रोहे अष्टमी(roha ashtmi) नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी दमखाडी येथील नगरसेवक महेश कोलाटकर यांची निवड करण्यात आली. समीर सकपाळ यांचा कार्यकाल पुर्ण झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर कोणाची निवड होणार याबद्दल गेले दोन दिवस रोह्यात प्रचंड उत्सुकता होती आज महेश कोलाटकर यांची या पदी निवड झाल्यानंतर ही उत्सुकता संपुष्टात आली.
महेश कोलाटकर यांची रोह्यात सजग लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा असून त्यांच्या निवडीनंतर सर्व स्तरातील रोहेकरांनी त्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व सर्व सहकारी नगरसेवकांनीही महेश कोलाटकर यांचे विशेष अभिनंदन केले.
रायगडचे खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री  आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, सर्व सहकारी नगरसेवक, नगरसेविका व समस्त रोहेकरांनी आपल्यावर टाकलेल्या विश्वासाबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करुन आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया रोह्याचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष महेश कोलाटकर यांनी व्यक्त केली. रोहे अष्टमीतील शेवटच्या घटकापर्यंत पालिकेची सेवा पोचवण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.