लोकांना पंचनाम्यासाठी वाट पाहावी लागतेय ही गंभीर बाब – माणिक जगताप

म्हसळा : कोकण किनारपट्टीत ३ जून रोजी झालेल्या चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याची प्रचंड हानी झाली. म्हसळा तालुक्यातील वादळग्रस्त भागाची पाहणी महाड-पोलादपूरचे माजी आमदार तथा

 म्हसळा : कोकण किनारपट्टीत ३ जून रोजी झालेल्या चक्रीवादळात रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्याची प्रचंड हानी झाली. म्हसळा तालुक्यातील वादळग्रस्त भागाची पाहणी महाड-पोलादपूरचे माजी आमदार तथा काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष माणिकराव जगताप यांनी आज केली.  झालेल्या नुकसानीचा नागरिकांकडून  त्यांनी आढावा घेतला. यावेळी काही ठिकाणी माणिकराव जगताप यांनी नागरिकांना मेणबत्यांचे वाटप केले. 

जगताप यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या. वादळ होऊन सहा – सात दिवस उलटूनही अजून पंचनामे का होऊ शकले नाहीत. याबाबत नाराजी व्यक्त करताना लोकांचा आणखी किती अंत पाहणार, असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला केला. म्हसळा तालुक्यातील नागरिकांना पंचनाम्यासाठी एवढे दिवस वाट पहावी लागणे ही अतिशय गंभीर बाब असून त्वरित भरपाई न दिल्यास काँग्रेसला आंदोलन करावे लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. वादळ इतके भयानाक होते की गेल्या १४० वर्षात असा प्रसंग उद्भावला नाही. त्यामुळे आजही लोकांच्या मनात अत्यंत भीती निर्माण झाली असल्याचे सांगून या वादळात ज्यांच्या घराचे अंशतः नुकसान झाले आहे त्यांना दोन लाख रुपये, ज्यांचे पन्नास टक्के नुकसान झाले आहे त्यांना पाच लाख आणि ज्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे त्यांना त्वरित दहा लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी आमदार माणिकराव जगताप यांनी केली आहे.

यावेळी माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या समवेत रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा श्रद्धा ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेस सरचिटणीस फझल हालडे, पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष डॉ.मुईज शेख, मुस्लिम समाज अध्यक्ष मोहम्मद अली पेनकर, माजी नगराध्यक्ष दिलीप कांबळे, रफिक घरटकर, संजय खताते आदी मान्यवर उपस्थित होते.