Devendra-Fadvanis

महाड : कृषी कायद्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारला शहाणपणाची भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे. यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावला आहे.

शरद पवार कृषीमंत्री असताना टास्क फोर्सने दिलेल्या सूचनांच्या आधारे हे कायदे करण्यात आले आहेत. त्यांनी कृषी कायद्यांच्या मूळ तत्वांना विरोध केलेला नाही. ते कधी त्याच्यावर बोलत नाहीत. त्यामुळे शरद पवार यांच्यासमोर कृषी कायद्यांचे समर्थन करावा की विरोध करावा, असा यक्षप्रश्न आहे असे फडणवीस म्हणाले.

मात्र, वाहत्या गंगेत अनेक जण हात धुत आहेत. शेतकरी आंदोलकांत काही गट असून त्यांना आंदोलन सुरु ठेवायचे आहे. त्यांना आंदोलनावर तोडगा काढायचा नाही, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

विरोधकांनी कृषी कायदे समजून घेण्याची गरज असल्याचे सांगत फडणवीस म्हणाले की, पंजाब आणि हरियाणा शिवाय इतरत्र कुठेही आंदोलन झाले नाही. महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी ट्रॅक्टर चालवण्याशिवाय काही केले नाही. शेतकऱ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. काही जण समजून घेऊनही झोपल्याचे सोंग करुन शेतकऱ्यांच्या फायद्याच्या कायद्यांना विरोध करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

कृषी कायद्यात ज्या बाबी आहेत त्यावर महाराष्ट्रात अगोदरच कायदे झाले आहेत. कृषी कायद्यांच्या अध्यादेशांच्या अंमलबजावणीचे आदेश काढणारे महाराष्ट्र पहिले राज्य आहे. कृषी कायदा हा शेतक-यांच्या फायद्याचे आहेत. ज्यांचे हितसंबंध अडचणीत ते शेतक-यांना दिशाभूल करताहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला केला आहे.