माथेरान पर्यटकांनी फुलले ; पर्यटन पूर्वपदावर आल्याने व्यवसायिकांना मोठा दिलासा

गेल्या दोन महिन्याच्या खडतर लॉकडाऊननंतर माथेरानमधील पर्यटनाला चालना मिळत आहे. मिनी ट्रेनच्या शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ केल्यामुळे अमन लॉज ते माथेरान असा स्वस्त दरात प्रवासाचा पर्याय पर्यटकांना उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शनिवार रविवारी पर्यटकांची वर्दळ येथे असते.

    माथेरान: कोरोना लॉकडाऊनमुळे ठप्प झालेला पर्यटनाचा व्यवसाय पुन्हा एकदापूर्व पदावर आल्याने माथेरानमधील व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. माथेरानमध्ये २६ जूनपासून पर्यटकांना प्रवेश देण्यात आल्यावर येथील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पर्यटनासाठी येणारे पर्यटक मास्क परिधान करून निर्सग सौंदर्याचा आनंद घेत आहेत. गावातील अंतर्गत पॉईंट्स फिरण्यासाठी अस्तित्वात असणारी वाहतूक व्यवस्था वगळता, इथे राहण्याची व्यवस्था सध्या स्वस्त असल्याने अनेकजण एक दिवस मुक्काम करण्यास पसंती देत आहेत.

    गेल्या दोन महिन्याच्या खडतर लॉकडाऊननंतर माथेरानमधील पर्यटनाला चालना मिळत आहे. मिनी ट्रेनच्या शटल सेवेच्या फेऱ्यात वाढ केल्यामुळे अमन लॉज ते माथेरान असा स्वस्त दरात प्रवासाचा पर्याय पर्यटकांना उपलब्ध झाला आहे. त्यामुळे शनिवार रविवारी पर्यटकांची वर्दळ येथे असते.

    नियम मोडल्यास होतेय कारवाई
    नगरपरिषद आणि पोलीस प्रशासन देखील विनामास्क आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. पर्यटनाला चालना म्हणून सध्या माथेरानमध्ये व्यावसायिकांना शनिवार व रविवारी दुकान उघडे ठेवायची सूट दिली आहे. पण ही मर्यादा शिथिल करून जर दुकाने जास्त वेळ उघडी ठेवण्यास मुभा दिली, तर व्यवसायास चालना अधिक देता येईल. तसेच गर्दीचे विकेंद्रीकरण होईल.