matin diwan

पनवेल : युसूफ मेहेरअली सेंटरच्या(yusuf meher ali centre) वाटचालीत मागील पन्नास वर्षे सहभाग असलेले सेंटरचे स्वयंसेवक ते प्रकल्प संचालकापासून नुकताच उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणाऱ्या तसेच ग्रामीण भागातील मुस्लिम मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने आपटा येथील उर्दू शाळेचे संस्थापक मतीन दिवाण(matin diwan) यांचे शनिवारी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले असून त्यांच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कोरोनाच्या महामारीमध्ये तारा व जवळच्या २०-२५ गावांमध्ये जावून गरजू गरीबांना मदत करण्यासाठी मतीन दिवाण यांनी एका योद्ध्यासारखे  काम केले. स्थलांतरीत लोकांची सेवा केली. युसूफ मेहेरअली सेंटरने समाजवादी विचारांचे विधायक उपक्रम सुरू केले प्रसंग आला तर संघर्ष केला मतीण दिवाण यांनी नेहमीच पुढे राहून त्याचे नेतृत्व केले. त्यांचे उर्दू भाषेवर प्रेम होते. उर्दूनी दिलेले प्रेम आणि माणुसकी त्यांचा प्राण होती. आपटा येथे सहकारी जमा करून जागा मिळवली व उर्दू शाळा सुरू केली. आज तेथे ज्युनिअर कॉलेज मुलांचे भविष्य घडवित आहे.

सेंटरने सुरू केलेले ग्रामोद्योग हा महात्मा गांधीजी व युसुफ मेहेरअली यांच्या विचारांचा पाया आहे हे संस्थेचे संस्थापक स्वातंत्र्य सेनानी  जी जी परिख यांनी तारा परिसरात बिंबवले. मतीन दिवाण यांनी हे मार्गदर्शन अंगिकारले आणि शेवटच्या श्वासापर्यंत अमलात आणले. डॉ. जी जी परिख व दिवाण हे गुरू शिष्य म्हणून  संपुर्ण रायगड जिल्ह्यामध्ये माहिती होते.

स्वयंरोजगाराचा पाया तारा संकुलात निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान होते. कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थितीशी सामना करीत असताना त्यांचे निधन सेंटरसाठी मोठा आघात आहे. केवळ सेंटरच नव्हे तर सर्व सामाजिक संघटना,संस्था यांच्याशी त्यांचे प्रेमाचे व सहकार्याचे संबंध होते. दिवाण यांच्यावर याअगोदर हृदयाची शस्त्रक्रिया होऊन पेस मेकर बसवलेला असतानासुद्धा सेंटरच्या कामात सातत्याने कार्यरत राहाणे हे ते कर्तव्य समजत होते.अखंड काम करण्याची जिद्द असलेले मतीन दिवाण यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने सेंटरचे अपरिमित नुकसान झाले आहे.सेंटर म्हणजे मतीन आणि मतीन दिवाण म्हणजेच सेंटर अशी ओळख झाली होती.मतीन दिवाण म्हणजे युसूफ मेहेरअली सेंटरच्या कर्तृत्वाचा मैलाचा दिपस्तंभ होता अशा शब्दांत संस्थेचे संस्थापक  स्वातंत्र्य सैनिक डॉ.जी.जी.पारीख, यांनी व्यवस्थापन समितीच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.