म्हसळा घोणसे घाटात इंधन वाहतूक करणार्‍या टँकरचा अपघात

म्हसळा :मुंबई शिवडीहुन माणगाव म्हसळा मार्गे श्रीवर्धन येथे पेट्रोल, डिझेल इंधनाची वाहतूक करीत असलेल्या टँकरचा म्हसळा तालुक्यातील अपघाताचा कर्दनकाळ ठरलेल्या घोणसे घाटात केळेवाडी येथील

 म्हसळा : मुंबई शिवडीहुन माणगाव म्हसळा मार्गे श्रीवर्धन येथे पेट्रोल, डिझेल इंधनाची वाहतूक करीत असलेल्या टँकरचा म्हसळा तालुक्यातील अपघाताचा कर्दनकाळ ठरलेल्या घोणसे घाटात केळेवाडी येथील तीव्र उताराच्या वळणावर आज सकाळी अपघात झाला आहे. टँकर चालकाचा इंधनाने भरलेल्या गाडीचा झोका गेल्याने टँकर तीव्र उताराचे वळणावर जागीच पलटी झाला. अपघातात टँकरचा चालक किरलोक जखमी झाला असून ज्या ठिकाणी अपघात झाला आहे तो वळण खुपच धोकादायक असून त्याच ठिकाणी अनेक वाहनांचे अपघात होतात. असे असले तरी ह्या तीव्र उताराचे रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे बांधकाम गेली दोन वर्षे रखडले आहे. अपघाती भारत पेट्रोलियमच्या टँकरमध्ये ८ हजार लीटर पेट्रोल व ४ हजार लीटर डिझेल असल्याचे सांगण्यात आले सदर इंधन श्रीवर्धन येथिल लांबे ऑटोमोबाइल येथे नेण्यात येणार होते. टँकर म्हसळा घोणसे घाटात उतरत असताना चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने या टँकरचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर घाट परिसरातील नागरिकानी जीव धोक्यात टाकुन पेट्रोल, डिझेल गोळा करण्यासाठी गर्दी केली होती. टँकरला अपघात झाल्याने किमान ३ हजार लिटर पेट्रोल व डिझेल वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपघाताची माहिती मिळताच तहसिलदार शरद गोसावी,सर्कल दत्ता कर्चे,पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धनंजय पोरे,पोलीस निरीक्षक दिपक धूस,हवालदार भोईर,पोलीस कारकिले हे घटनास्थळी पोहचले आणि क्रेनच्या सहाय्याने अपघाती टँकर रस्त्यावरून बाजूला करण्यात आला.