चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे – तहसीलदार शरद गोसावी

म्हसळा :निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ३ जूनला म्हसळा तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच ३ जूनला म्हणजेच उद्या कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने

 म्हसळा : निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ३ जूनला म्हसळा तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच ३ जूनला म्हणजेच उद्या कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचे निसर्ग चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून येत्या ४८ तासांमध्ये हे वादळ रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवरील भागात धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मच्छीमारांना खोल समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली असून बचाव पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच उद्या नागरिकांनी घरातच राहून जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन म्हसळा तहसीलदार तथा आपत्ती व्यवस्थापन प्रमुख शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, नायब तहसिलदार के.टी.भिंगारे उपस्थित होते.

 कोकण किनारपट्टीवर तयार झालेले चक्रीवादळ ३ जूनला रायगड जिल्ह्यातील हरीहरेश्वर दरम्यानच्या परिसरात धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात मुसळधार ते अतिमूसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील कोव्हीड -१९ नियंत्रण कक्षाचे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा कक्षात कार्यान्वित करण्यात आले असल्याचे तहसीलदार गोसावी यांनी यावेळी सांगितले. म्हसळा तालुक्यातील वरळ, मेंदडी, खरागाव बुद्रुक, पाभरे, निगडी, आंबेत, संदेरी, खरसई, या खाडी लगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा संबंधित तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस, शहरात नगरपंचायत, तालुक्यात पंचायत समिती ग्रामविकास विभाग यंत्रणा  देखील सज्ज असल्याचे गोसावी यांनी सांगितले.

बुधवार ३ जून रोजी होणाऱ्या जनता कर्फ्यूत म्हसळा शहरातील व तालुक्यातील अत्यावश्यक सेवेतील फक्त मेडीकल व वैद्यकिय सुविधा सुरु रहाणार आहेत व रेशन दुकानांसह सर्व दुकाने बंद रहाणार आहेत असे सहाय्यक पोलीस निरिक्षक धनंजय पोरे यांनी सांगितले.