म्हसळा तालुक्यात गेला कोरोनाचा पहिला बळी – दुर्गवाडी गावातील वृद्धाचा होम क्वारंटाईन दरम्यान मृत्यू

म्हसळा :रायगड जिल्ह्यातील खेडेगावात रोज हजारोच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी येत आहेत. त्यामुळे शहरी भागातून ग्रामीण भागात येणाऱ्या नागरिकांकडून कोरोनाचा शिरकाव होण्याची जास्त भीती आहे. असाच

म्हसळा : रायगड जिल्ह्यातील खेडेगावात रोज हजारोच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी येत आहेत. त्यामुळे शहरी भागातून ग्रामीण भागात येणाऱ्या नागरिकांकडून कोरोनाचा शिरकाव होण्याची जास्त भीती आहे. असाच मुंबई मधून म्हसळा तालुक्यात आलेल्या एका वयोवृद्ध व्यक्तीचा होम क्वारंटाईन दरम्यान मृत्यू झाला असून त्याचा टेस्ट रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की म्हसळा तालुक्यातील नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी गावामधील ७३ वर्षीय  वयोवृद्धाचा होम क्वारंटाईन दरम्यान मृत्यू झाला आहे. हा माणूस १६ मे रोजी मुंबईमधील बोरिवली विभागातून गावी आलेला होता. त्यानंतर १८ मे रोजी त्याचा मृत्यू झाला आहे. आज त्याचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे म्हसळा नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.  म्हसळा तालुक्यातील हा पहिलाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला असून त्याचा मृत्यू झाला आहे. 

म्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी गावातील मयत झालेल्या वृद्धाचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या वृद्धाचा संशयास्पदरित्या १८ तारखेला मृत्यू झाला असून देखील कालपर्यत नगरपंचायत आणि तालुका प्रशासनाकडून कोरोना पार्श्वभूमीवर कोणतीच काळजी घेतली गेली नाही. होम क्वारंटाईनमध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याची अंत्यविधी करायला घेऊन जाण्यासाठी नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी साधा स्ट्रेचर सुद्धा आणला नव्हता तर मयत व्यक्तीची बॉडी (शव) गावातून अशीच उचलत उचलत अंगणात थोडा थोडा वेळ ठेवत ठेवत घेऊन गेले. गावात जवळपास ७५ ते ८० नागरिक मुंबईमधून आलेले आहेत असे असताना या नागरिकांच्या आरोग्याचा दृष्टीने शासकीय स्तरावरून योग्य देखभाल ठेवली जात नाही. होम क्वारंटाईन केलेल्या लोकांच्या आरोग्य तपासणीसाठी संबंधित यंत्रणा उपस्थित राहत नाहीत. आमच्या गावातील व्यक्तीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर नगरपंचायतने निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी मशीन पाठवली होती. मात्र ती फवारणी संपूर्ण गावात न करता काही ठिकाणीच अर्धवटच फवारणी करून कर्मचारी निघून गेले. या सर्व परिस्थिती बाबत आम्ही तालुक्याचे तहसीलदार व आरोग्य अधिकारी यांना आज गावात आल्यावर विचारणा केली असता त्यांनी आमच्या कडे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नाहीत म्हणून आम्ही तुम्हाला सेवा देऊ शकत नाही असे उत्तर दिले. यावरून नगरपंचायत प्रशासन व स्थानिक तालुका प्रशासनाला कोरोनाचे घटनेचा गांभीर्य किती आहे हे लक्षात येते. नगरपंचायत व तालुका प्रशासनाच्या अशा हलगर्जीपणा व सुस्त कारभारामुळे जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे अशी माहिती दुर्गावाडी ग्रामविकास मंडळाचे मुंबई अध्यक्ष सुभाष गोविंद कदम यांनी माहिती देताना सांगितले. त्याचबरोबर आता झाला प्रकार होऊन गेला परंतु आता तरी स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊन आमच्या गावात कोरोनाचे विषाणूंचा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना करून द्याव्यात अशी मागणी अध्यक्ष सुभाष कदम यांनी केली आहे.

दुर्गवाडी गावातील मृत व्यक्ती १६ मे रोजी बोरीवली येथून आली आहे. त्यांचा १८ रोजी मुत्यु झाला. त्यांच्यावर १९ तारखेला अंत्यसंस्कार केले असून आज त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या सोबत होम क्वारंटाईनमध्ये असलेला मुलाला तपासणीसाठी पुढे दवाखान्यात पाठवले आहे. नागरिकांनी घरातच थांबून आपली काळजी घ्यावी. या पुढील संपूर्ण दक्षता नगर पंचायत घेत आहे.  – मनोज उर्कीडे ,मुख्याधिकारी नगरपंचायत म्हसळा