म्हसळ्यात मृत्यू झालेल्या चाकरमानी महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह

म्हसळा : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातील मजुरांचे लोंढे आपापल्या गावाकडे परतणे सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पनवेल या परिसरांतून चाकरमानी पायी अथवा मिळेल त्या

 म्हसळा : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागातील मजुरांचे लोंढे आपापल्या गावाकडे परतणे सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे मुंबई, ठाणे, पनवेल या परिसरांतून चाकरमानी पायी अथवा मिळेल त्या साधनाने कोकणात आपल्या मूळ गावकडे येत आहेत. त्यातच शनिवारी पनवेल येथून येणाऱ्या एका कुटुंबातील ६२ वर्षीय महिलेचा प्रवासा दरम्यान मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १६ मे रोजी सायंकाळी घडली होती. पनवेल येथील हॉटस्पॉट परिसरांतील कुटुंबातील ९ प्रवासी आपल्या गावाकडे आले होते. यामधील खारगाव बुद्रुक येथील ६२ वर्षीय महिलेचा दुर्दैवी अंत झाला होता. 

या महीलेला दमा, उच्च रक्तदाब पहिल्यापासून असल्याचे नातलगांनी सांगितले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घटनेचे गांभीर्य ओळखून मृत महिलेचे स्वॅब सँपल तात्काळ शासकीय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. आज या मृत महिलेचे कोरोनाचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे म्हसळा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कांबळे यांनी सांगितले. सदर महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असल्याने तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. असे असले तरी चाकरमानी महिलेचा मृत्यू झाल्याने अनेकांच्या काळजात धडकी भरली असून कोरोनाचे पार्श्वभूमीवर आणि गावागावात चाकरमान्यांची वाढती गर्दी, होम क्वारंटाईन नियमावली यावर प्रशासनाकडून कडक पावले उचलली जावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.