म्हसळा तालुक्यात २ नवे रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४ वर, एकाचा मृत्यू

म्हसळा :सध्या सर्वत्र कोरोन रोग पसरला असून या रोगाचे विषाणू सगळीकडे पसरत आहेत. कोरोना संसर्गजन्य विषाणूंची साखळी रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सुरुवातीला राज्यातील मुंबई, पुणे या

म्हसळा : सध्या सर्वत्र कोरोन रोग पसरला असून या रोगाचे विषाणू सगळीकडे पसरत आहेत. कोरोना संसर्गजन्य विषाणूंची साखळी रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. सुरुवातीला राज्यातील मुंबई, पुणे या शहरात कोरोनाचे विषाणू फैलावत होते. मात्र आता हळूहळू राज्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव सुरू झाला आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ०४ झाली असून दुर्गवाडी गावातील एक पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, ग्रुपग्रामपंचायत पाभरे हद्दीतील पाभरे (कोळीवाडा) आणि गायरोने गावातील दोन व्यक्तींचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईतील वडाळा येथून १८ मे रोजी ४८ वर्षीय व्यक्ती आपल्या कुटुंबांसमवेत मूळ गावी मौजे पाभरे येथे आला होता. पाभरे येथे या व्यक्तीसह त्याच्या कुटुंबाला शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर पुढील तपासणी व उपचारासाठी या रुग्णाला अलिबाग येथे पाठविण्यात आले होते. त्याचबरोबर पाभरे ग्रामपंचायत हद्दीतील गायरोने गावातील ४३ वर्षीय व्यक्ती १९ मे रोजी काळबादेवी मुंबई येथून प्रवास करून गावी आला आहे. या व्यक्तीला देखील कोरोनाची लागण झाली असून त्याचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. तसेच ग्रुप ग्रामपंचायत कोळे हद्दीतील तळवडे (तुळशीवाडी) गावातील एका ६० वर्षीय महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. ही महिलादेखील १९ मे रोजी सांताक्रूझ मुंबई येथून प्रवास करून गावी आली आहे. या महिलेला चार दिवसांपूर्वी कोरोना संदर्भात काही लक्षणे दिसून येत असल्याने ती माणगाव येथे दवाखान्यात गेली होती. तिथे तिचे नमुने घेऊन डॉक्टरने तिला घरी जाण्यास सांगितले आणि तिच्या मुलाने तिला माणगाव ते तळवडे असा बाईकवरून प्रवास करून घरी आणले होते. यानंतर मधल्या तीन-चार दिवसांत अनेक नातेवाईक व गावातील नागरिक तिची विचारपूस करण्यासाठी संपर्कात आलेले आहेत.
   याअगोदर म्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी गावातील एका ६० वर्षीय व्यक्तीचा होम क्वारंटाइन दरम्यान मृत्यू झाला असून त्याचे देखील कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. तसेच आता बाधित 3 रुग्णांना पुढील उपचारासाठी दवाखान्यात ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या काही संशयित व्यक्तींना प्रशासकिय यंत्रणेच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.
मागील आठ दिवसांच्या आत तालुक्यात चार कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. भविष्यात तालुक्यात कोरोना बाधित आणखी काही रुग्ण सापडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
  याअगोदर म्हसळा नगरपंचायत हद्दीतील दुर्गवाडी हे गाव सील केले असून पाभरे, गायरोने व तळवडे या गावात प्रत्येकी एक कोरोना  रुग्ण सापडले असल्याची माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाला दिलेली आहे. यावरून ही तीन गावे सील करण्याचे काम पोलीस प्रशासनाचे आहे असे म्हसळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.गणेश कांबळे यांनी माहिती देताना सांगितले आहे. त्याचबरोबर याआधी ५ संशयित व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आलेले होते. यापैकी दुर्गवाडी गावातील दोघांचे आणि चिरगाव येथील एकाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून उर्वरित दोन व्यक्तींचे रिपोर्ट येणे बाकी आहेत, असेही डॉ.कांबळे यांनी सांगितले.
  तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या पाभरे ग्रामपंचायत विविध वाड्या, वस्त्यांमध्ये ५०० पेक्षा जास्त चाकरमानी मुंबईकर आपल्या मूळगावी आलेले आहेत. आतापर्यंत या ग्रामपंचायतीमध्ये पाभरे (कोळीवाडा) व गायरोने या गावात प्रत्येकी एक असे एकूण २ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. स्थानिक ग्रामसेवक व तालुका प्रशासन यांनी या अगोदर पाभरे ग्रामपंचायतकडे कोरोना पार्श्वभूमीवर खबरदारी व उपाययोजना याबाबत योग्यरित्या लक्ष दिलेले नाही. अनेक वेळा ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तहसीलदार, तालुका वैद्यकीय अधिकारी यांना येथील नागरिकांची परिस्थिती सांगूनदेखील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता ग्रामपंचायत हद्दीत कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत आहे, अशी माहिती पाभरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान ग्रा.पं.सदस्य अनिल बसवत यांनी दिली आहे. त्याचबरोबर आतातरी स्थानिक प्रशासनाने ग्रामपंचायत हद्दीत व्यवस्थित लक्ष देऊन कोरोनाचा वाढत असलेला प्रभाव थांबविण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अनिल बसवत यांनी केली आहे.