म्हसळ्यात आणखी ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण -तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०, दोघांचा मृत्यू

म्हसळा :राज्यात विविध जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना आता रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातदेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. तालुक्यात

 म्हसळा : राज्यात विविध जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असताना आता रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातदेखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे. तालुक्यात याआधी दुर्गवाडी, पाभरे कोळीवाडा, गायरोने, तळवडे, वारळ, कणघर, ठाकरोली या गावांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. तर आज  पुन्हा पाभरे ग्रामपंचायत मधेच तीन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळाल्याने पाभरे ग्रामपंचायतीसह तालुक्यातील नागरिक चिंतेत असून सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

म्हसळा तालुक्यात २६ मे रोजी दुसरा कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला होता. मुंबईतील वडाळा भागातून १८ मे रोजी एक ४८ वर्षीय व्यक्ती आपल्या कुटुंबांसमवेत मूळ गावी मौजे पाभरे येथे आला असता त्याला त्याच्या कुटुंबासह शाळेमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु कोरोनाची लक्षणे आढळून आल्यानंतर पुढील तपासणी व उपचारासाठी या रुग्णाला अलिबाग येथे पाठविण्यात आले. तेथे त्याचे स्वॅब घेऊन ते कोव्हीड-१९ तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल २६ मे रोजी पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यांपैकी तीन लहान मुलांचे रिपोर्ट आज शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.गणेश कांबळे यांनी सांगितली आहे.
हे तीनही रुग्ण एकाच कुटुंबातील असून त्यांचे वय १२ वर्ष (स्त्री), ०६ वर्ष (पुरुष), आणि ०४ वर्ष (पुरुष) असे आहेत. तीनही जणांना पुढील उपचारासाठी पनवेल येथे पाठविण्यात आले असल्याचे डॉ.कांबळे यांनी सांगितले.पाभरे ग्रामपंचायत मधे एकूण ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून आज आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने म्हसळा तालुक्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या – १० झाली असून यांपैकी याअगोदर दोघांचा मृत्यू झाला आहे.