म्हसळ्यात व्यापारी वर्गाकडून दुप्पट किमतीने मालाची विक्री, प्रशासनाचे नाही नियंत्रण

म्हसळा : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांची व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहे. त्यामुळे म्हसळा स्थानिक जनतेत तीव्र संताप पसरला आहे. म्हसळा

म्हसळा : निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या रायगड जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांची व्यापारी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहे. त्यामुळे म्हसळा स्थानिक जनतेत तीव्र संताप पसरला आहे. म्हसळा तालुक्यात व्यापारी वर्गाकडून दाम दुपटीने मालाची विक्री होत असल्याचे दिसून येत आहे. पण या गोष्टीची प्रशासनाला काहीच फिकीर नसल्याचे दिसून येत आहे. या संकट काळात जनतेला धीर देण्याची वेळ असताना त्यांची फायदा मिळविण्याची वृत्ती म्हणजे मृताच्या टाळूवरील लोणी खाल्ल्यासारखेच आहे, असे म्हसळा तालुक्यातील नागरिकांडून बोलले जात आहे. देशावर आलेल्या कोरोनासारख्या मोठ्या संकटातून लोक सावरायचा प्रयत्न करीत असताना चक्रीवादळाचे मोठ संकट त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले. या संकटात उध्वस्त झालेल्या लोकांकडून व्यापाऱ्यांची लूट मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने लोकांकडून संताप व्यक्त होत आहे. गरिबांची ही  लूटमार करणाऱ्या व्यापाऱ्यांना चांगलीच जाचेल, असे म्हसळा तालुक्यात बोलले जात आहे.

निसर्ग वादळाचा तडाखा हा रायगड जिल्ह्यातील संपूर्ण नागरिकांना बसला आहे. चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांची घराची कौले, पत्रे, वासे तसेच गोठे, आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायत दारांच्या झाडांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून येत आहे. आपल्या घरांची, दुकानांची,गोठयांची कौले,पत्रे,ढापे पुन्हा नव्याने टाकण्याकरीता तालुक्यातील अनेक नागरिकांनी शहरातील दुकाने गाठली असता तेथील सिमेंटचे पत्रे,लोखंडी पत्रे,ढापे,कौले,लोखंडी पाईपचे भाव ऐकून म्हसळ्यातील नागरिकांच्या पायाखालची वाळूच सरकली. नेहमी ३०० रुपयांना मिळणारा सिमेंटचा ६ फुटी पत्रा सध्या ६०० रुपयांना मिळत आहे. तर ४०० रुपयांना मिळणार ८ फुटी पत्रा ८०० रुपयांना विकला जात आहे. ५५ रुपये फूट पातळ लोखंडी मिळणारा रंगीत पत्रा सध्या १०० रुपये फूट मिळत आहे. तसेच ९० रुपये फूट जाड रंगीत मिळणारा पत्रा १८० फूट मिळत आहे.रोज लाखो रुपयांचा माल विकणारे व्यापारी जाणूनबुजून कोणत्याही प्रकारचे टॅक्स सरकारला भरायला लागू नये म्हणून ग्राहकांना पक्के बिल देत नसल्याचे समजण्यात आले आहे.

कौले आणि ढाप्यांचे काम सध्या बंद असल्यामुळे कौल आणि ढाप्यांना सोन्याचा भाव आला आहे. थोडक्यात असे की निसर्ग चक्रीवादळाचा मार बसलेल्या नागरिकांचा संधी साधू आणि स्वार्थी व्यापारी दाम दुपट्टीने माल विक्री करून लूट करीत आहेत. आगोदरच कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला असून गोरगरीब नागरिकांचे हाल झाले आहेत. आता चक्रीवादळ आल्याने गोरगरीब नागरिकांचे नुकसान झाले असून नागरिकांची होणारी लूट प्रशासनाने त्वरित थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.