संचारबंदीच्या काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर म्हसळा पोलिसांची कारवाई, ४७ वाहने जप्त

म्हसळा :देशात तसेच राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. तसेच रायगड जिल्ह्यात संचारबंदी असतानाही म्हसळ्यामध्ये खाजगी वाहन चालक व विनाकारण वाहन

म्हसळा :देशात तसेच राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ३ मे पर्यंत लॉकडाऊन आहे. तसेच रायगड जिल्ह्यात संचारबंदी असतानाही म्हसळ्यामध्ये खाजगी वाहन चालक व विनाकारण वाहन चालविणाऱ्या चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनंजय पोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिपक ढुस, डी.सी.सरकटे, डी.कारखीले, एस.कराडे, गणेश भोईर यांनी अशा वाहन चालकांवर कारवाई करून त्यांची वाहने लॉकडाऊन उठेपर्यंत ताब्यात ठेवली आहेत. म्हसळा तालुक्यात पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे खाजगी वाहन चालक, बाईकस्वार यांच्या उरात धडकी भरली असून पोलिसांच्या या कारवाईचे तालुक्यात कौतुक होत आहे.

म्हसळा शहरासह ग्रामीण भागातील नागरिक जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याचा बहाण्याने मोठ्या प्रमाणात शहरात गर्दी करीत असून सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन करीत आहेत. याआधी अनेक खाजगी वाहन चालकांना समज देऊन सोडण्यात आले होते परंतु आता काही दिवसांत खाजगी वाहन चालकांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वाहन बंदी केली असताना देखील नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत आहे. मोटार वाहन कायद्याअंतर्गत विनाकारण गाडी चालवण्यात येणाऱ्या वाहन चालकांवर म्हसळा पोलीसांकडून कारवाई करण्यात आली. संचारबंदीच्या काळात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ४७ वाहने जप्त करण्यात आली असून यामध्ये ४४ दुचाकी, २ रिक्षा आणि १ टेम्पो गाडी यांचा समावेश आहे.