रेशनकार्ड नसलेल्यांनाही तातडीने अन्नधान्याची मदत करा- आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी

पनवेल: रायगड जिल्हयातील व विशेषतत्वाने पनवेल तालुक्यातील रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्याची तातडीने मदत मिळावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत

पनवेल: रायगड जिल्हयातील व विशेषतत्वाने पनवेल तालुक्यातील रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना शासनाच्या माध्यमातून अन्नधान्याची तातडीने मदत मिळावी, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 

आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पनवेल तालुक्यातील निरनिराळया विकासकामांच्या निमित्ताने तसेच उद्योगधंद्यांच्या निमित्ताने देशातील निरनिराळया राज्यातून व महाराष्ट्राच्या निरनिराळया भागातून अनेक लोक गामीण व शहरी भागात राहात आहेत. कोरोना महामारीच्या संकटामुळे आणि लॉकडाऊनमुळे या सर्वांचा रोजगार बंद झाला आहे. शासकीय अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार ही संख्या १ लाख ५० हजारच्या आसपास आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे या सर्व लोकांची उपासमार होत आहे. राजकीय पक्ष, स्वयंसेवी संस्था, शासनाची मदत यानंतरही कुटुंबासहित राहणाऱ्या लोकांना रोज जेवण मिळेलच याची शाश्वती नाही. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने तसेच पोलीसांकडून जमाव पांगवण्याच्या विविध प्रयत्नांमुळे अनेकांना उपासमारीस सामोरे जावे लागते. महाराष्ट्र शासनाने मे व जून महिन्यात धान्य देण्याचे जाहीर केले असले तरी ज्यांच्याकडे स्थानिक रेशनकार्डच नाही अशा या सुमारे दिड लाख लोकांना शासनाकडून तातडीने  अन्न-धान्याचीच मदत होणे अपेक्षीत आहे. म्हणून शासनाच्या आकस्मित निधीतून खर्च करून स्वस्त धान्य दुकानामार्फत या लोकांना विशेष बाब म्हणून तांदूळ, डाळ, तेल यासारख्या अन्नधान्याच्या वस्तू पुरवल्या जाव्यात, व त्याची तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे.  या संदर्भातील निवेदन त्यांनी पनवेलचे तहसीलदार अमित सानप यांनाही दिले आहे. यावेळी महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहराध्यक्ष जयंत पगडे, शहर सरचिटणीस व नगरसेवक नितीन पाटील, नगरसेवक अनिल भगत उपस्थित होते.