आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी यांची एमजीएम रुग्णालयाला भेट- कोरोनाग्रस्त रुग्णांशी संवाद

पनवेल : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी कामोठे एमजीएम रुग्णालयाला आजभेट देऊन त्या ठिकाणच्या कोरोनाग्रस्त रुग्णांशी संवाद साधून तेथील

पनवेल : भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी यांनी कामोठे एमजीएम रुग्णालयाला आज भेट देऊन त्या ठिकाणच्या कोरोनाग्रस्त रुग्णांशी संवाद साधून तेथील व्यवस्थेची पाहणी केली. कोरोना विषाणू प्रादुर्भाव पाहता सर्वत्र भितीचे वातावरण आहे, अशा परिस्थितीतही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकसेवा हेच ध्येय मानणारे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांचे मनोधैर्य वाढवले. 

पनवेल उपजिल्हा रुग्णालय आणि कामोठे येथील एमजीएम रुग्णालय कोविड रुग्णालय आहेत. रायगड जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर या ठिकाणी उपचार केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर व उरणचे आमदार महेश बालदी यांनी एमजीएम हॉस्पिटलला भेट दिली. त्याठिकाणी डॉ. सुधीर कदम आणि हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांशी चर्चा केली. त्याचबरोबर सुरक्षेचे नियम पाळून कोविड वॉर्डमध्ये जाऊन तेथील सुविधांची पाहणी केली तसेच कोरोनाग्रस्त नागरिकांशी संवादही साधला. पनवेल महानगरपालिका क्षेत्राबरोबरच ग्रामीण भागात आणि उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर तालुक्यामध्ये थोड्याफार प्रमाणात या आजाराचा संसर्ग झालेला आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्वात अगोदर पनवेल उपजिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल म्हणून जाहीर केले होते.  येथील सर्वसाधारण ओपीडी पनवेल महापालिकेच्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आली. त्याचबरोबर प्रसूती साठी आलेल्या महिलांना कळंबोली एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात येते. वाढत्या रुग्णांचा विचार करता एमजीएम रुग्णालय सुद्धा कोविड हॉस्पिटल जाहीर करण्यात आले. 

या दोन्ही ठिकाणी  कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. येथे दररोज जिल्ह्यातून रुग्ण येत आहेत. या रुग्णालयातून १०० पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिक काय व्यवस्था करावी लागेल, उपचारादरम्यान येणाऱ्या अडचणी व इतर गोष्टींची चर्चा करण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी एमजीएम रुग्णालयाला भेट दिली.या दोन्ही आमदारांनी उपचारादरम्यान येणार्‍या अडचणी जाणून घेतल्या. त्याचबरोबर डॉ. सुधीर कदम, वरिष्ठ डॉक्टर, निष्णात वैद्यकीय कर्मचारी यांचे पथक उत्कृष्ट काम करीत असल्याचे सांगून कामोठे एमजीएम हॉस्पिटल व्यवस्थापनाचे कौतुक केले.