मोरबे धरणाच्या दुरुस्तीला पाटबंधारे विभागाकडून सुरुवात – आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाला अनेक ठिकाणी गळती लागल्याची तक्रार करूनही त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत होते. पावसाळ्यात धरण भरल्यावर जास्त पाऊस पडल्यास तिवरे सारखी दुर्घटना

 पनवेल :  पनवेल तालुक्यातील मोरबे धरणाला अनेक ठिकाणी गळती लागल्याची तक्रार करूनही त्याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत होते.  पावसाळ्यात धरण भरल्यावर जास्त पाऊस पडल्यास तिवरे सारखी दुर्घटना घडण्याची भीती  व्यक्त करण्यात येत होती. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने पाटबंधारे विभागाकडून दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. 

पनवेल तालुक्यातील खैरवाडी- गारमाळ परिसरात जवळपास ५० एकरावर १९७३-७४ साली हे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचा  मुख्य बांध हा दगडी भिंतीचा आहे आणि त्या भिंतीला तडे गेल्यामुळे यातून पाणी गळती होते. या बांधाला मधोमध भेगा पडलेल्या आहेत. धरणाचा  बांध कमकुवत झाल्याचे ही परिस्थिती निर्माण झाली होती. या धरणाच्या  पाण्याचा वापर आजूबाजूच्या गावातील शेतीसाठी तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांना पिण्यासाठी केला जातो. विशेष म्हणजे याच धरणातील पाण्यावरच गारमाळ, मोरबे,येरमाळ आदी परिसरातील नागरिक दुबार भाताचे पीक घेतात. या धरणाची क्षमता ३. २२ दशलक्ष घनमीटर धारण क्षमता असून ३. १२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असतो. पनवेल तालुक्यातीत पाणी टंचाई असताना धरणातून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. त्यामुळे या धरणाची गळती थांबवावी, अशी मागणी धरण क्षेत्रातील ग्रामस्थ करीत होते.  या भागात पावसाचे प्रमाण खूप असते. परंतु जर अतिवृष्टी झाली तर हा दगडी बांध  बांध फुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचा फटका आजूबाजूच्या गावासह नवीन पनवेलला बसण्याची शक्यता असल्याने याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश  पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंत्याना दिले होते. संबंधित अधिकाऱ्याने या जलाशयाची पाहणी केली . त्यानंतर क्षेत्रिय स्तरावर अंदाजपत्रक तयार करण्यात आले. परंतु कोरोना संकटामुळे काम सुरू होण्यास काहीसा विलंब झाला. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत मोरबे धरणाची दुरुस्ती महत्त्वाचे असल्याने पाटबंधारे विभागाने हे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले आहेत.