खासदार सुनील तटकरे यांनी घेतला श्रीवर्धनमधील परिस्थितीचा आढावा

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा व मदत वाटपाची परिस्थिती पाहण्यासाठी खासदार सुनील तटकरे श्रीवर्धन येथे आले होते. यावेळी श्रीवर्धन नगर परिषदेच्या कार्यालयातील नगराध्यक्षांच्या

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील परिस्थितीचा आढावा व मदत वाटपाची परिस्थिती पाहण्यासाठी खासदार सुनील तटकरे श्रीवर्धन येथे आले होते. यावेळी श्रीवर्धन नगर परिषदेच्या कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे, तहसीलदार सचिन गोसावी, नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दर्शन विचारे त्याचप्रमाणे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

श्रीवर्धन तालुक्यासाठी एकूण ५४ कोटी रुपयांची मदत आलेली आहे. त्यापैकी २३ कोटी रुपयांचे वाटप झालेले असून उर्वरित ३१ कोटी रुपयांच्या वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर २३ दिवस झाले तरीही श्रीवर्धन तालुक्यात वीज पुरवठा सुरळीत होऊ शकलेला नव्हता. याबाबत त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना श्रीवर्धनमध्ये उपस्थित राहून येत्या सात ते आठ दिवसांमध्ये संपूर्ण तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत सूचना दिल्या. तसेच श्रीवर्धन शहरामध्ये पडलेला कचरा उचलण्यासाठी अतिरिक्त मजूर व वाहनांची व्यवस्था करण्याच्या सूचना श्रीवर्धनचे मुख्याधिकारी किरण कुमार मोरे यांना दिल्या. यावेळी श्रीवर्धनचे महावितरणचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र वाकपैजण हेदेखील उपस्थित होते.

येत्या रविवारपर्यंत श्रीवर्धन शहरातील संपूर्ण वीजपुरवठा सुरू होईल असे त्यांनी सुनील तटकरे यांना सांगितले. तसेच श्रीवर्धन समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर  सुरुची झाडे पडली आहेत. तसेच कचरादेखील खूप आहे. याबाबत खासदार तटकरे यांचे लक्ष वेधले असता त्यांनी जिल्हा वन अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांनादेखील श्रीवर्धन मध्ये येऊन संपूर्ण परिसराची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. श्रीवर्धन समुद्रकिनारी सुरुची झाडे ज्या ठिकाणी होती ती सर्व जागा वनविभागाच्या अखत्यारीत येते. यावेळी खासदार तटकरे यांनी तालुक्यातील शासकीय इमारती त्याचप्रमाणे प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांच्या दुरुस्त्या तातडीने करण्याच्या सूचना दिल्या. ज्यांचे अंशतः नुकसान झाले आहे त्यांना पंधरा हजार रुपये नुकसानभरपाई, त्याचप्रमाणे ज्यांचे २५ टक्के नुकसान झाले असेल त्यांना २५ हजारांची नुकसान भरपाई, ज्यांचे ५० टक्के नुकसान झाले असेल त्यांना पन्नास हजार रुपये नुकसानभरपाई दिली जाईल. तर ज्यांचे घर पूर्णपणे पडलेले आहे अशांना दीड लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाणार असल्याची माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. यावेळी उपस्थित पत्रकारांनी खासदार तटकरे यांना प्रश्न केला की हेक्टरी ५० हजार रुपये दिली जाणारी नुकसानभरपाई अतिशय तुटपुंजी आहे. कारण श्रीवर्धन शहरात हेक्‍टरमध्ये किंवा एकरांमध्ये जमिनी अजिबात नाहीत. ज्या आहेत त्या गुंठ्यांमध्ये आहेत. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना प्रति गुंठा पाचशे रुपये इतकीच मदत मिळणार असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. त्यावर खासदार तटकरे यांनी आपण  श्रीवर्धनमधील शेतकऱ्यांना नारळाची व सुपारीची किती झाडे पडली आहे त्याची गणना करून सुधारित मदत देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

गोंडघर येथील स्विचींग स्टेशन सुरू झाल्यानंतर शिस्ते, कापोली, बोर्लिपंचतन या गावांचा वीज पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याची माहितीदेखील तटकरे यांनी दिली. वादळापूर्वी जसे श्रीवर्धन होते तसे सहा महिन्यात करून या ठिकाणी जास्तीत जास्त पर्यटक येतील अशा प्रकारे श्रीवर्धनचा विकास केला जाईल.कारण श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांचा पर्यटन व्यवसाय हाच महत्त्वाचा व्यवसाय आहे. फक्त श्रीवर्धन नगरपालिका हद्दीमध्ये निवास व न्याहरी योजनेची दोनशे घरगुती हॉटेल्स असल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी दिली. ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच सागरी महामार्गाचे काम देखील सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. टीका करणाऱ्या लोकांचे जास्त मनावर न घेता आपण काम करीत राहणार आहेत. यावेळी उपस्थित असलेल्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना त्यांनी आपापल्या विभागाकडील अपूर्ण असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.