सामान्य ग्राहकांना न्याय न दिल्यास महावितरणच्या अधिकार्‍यांना कोंडून ठेवण्याचा इशारा

  • कोरोना महामारीच्या संकट काळातही अतिरिक्त विद्युत भार, वाढीव बिले, घर बंद असूनही आलेले बिल व इतर तांत्रिक विषयांवर भाजप पदाधिकार्‍यांकडे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. यासंबंधी स्थानिक विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ज्या तक्रारदारांची पत्रे प्राप्त झाली आहेत त्यांचा वीजपुरवठा पडताळणी होईपर्यंत खंडित होणार नाही,

पनवेल : महावितरणने सात दिवसात वाढीव वीज बिल आणि दरवाढ रद्द करून , सामान्य ग्राहकांना न्याय न दिल्यास  पुढच्या आठवड्यात त्यांच्या प्रत्येक कार्यालयाला टाळे ठोकून अधिकार्‍यांना आत मध्ये कोंडून ठेवण्याचा इशारा भाजपचे  उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष  आमदार प्रशांत ठाकूर यांनी  भारतीय जनता युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवार  ४ ऑगस्ट रोजी केलेल्या टाळेबंद आंदोलन प्रसंगी भिंगारी येथे दिला. 

कोरोना महामारीच्या संकट काळातही अतिरिक्त विद्युत भार, वाढीव बिले, घर बंद असूनही आलेले बिल व इतर तांत्रिक विषयांवर भाजप पदाधिकार्‍यांकडे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. यासंबंधी स्थानिक विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ज्या तक्रारदारांची पत्रे प्राप्त झाली आहेत त्यांचा वीजपुरवठा पडताळणी होईपर्यंत खंडित होणार नाही, असे आश्वासन देऊन ही  कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने पनवेलच्या जनतेचा रोष वाढतच असल्याने सदर बिले सुधारून मिळावीत यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पनवेल-भिंगारी येथील कार्यालयासमोर मंगळवार सकाळी ११ वाजता प्रतिकात्मक  टाळेबंद आंदोलन केले  

यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष  आमदार प्रशांत ठाकूर , महापौर डॉक्टर कविता चौतमोल,सभागृहनेते परेश ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत , शहर अध्यक्ष जयंत पगडे , भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर,तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील , जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी,,प्रभाग ड अध्यक्ष तेजस कांडपिळे ,  नगरसेवक नितिन पाटील , अण्णा शेट्टी , संजय भोपी , अजय बहिरा , माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, नगरसेवक, नगरसेविका, पंचायत समिती सदस्य, यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांचा सहभाग होता. 

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी कोरोना संक्रमण पाहता केंद्र सरकारने गोरगरिबांसाठी ७० हजार कोटी रुपयांचे तर उद्योगधंद्यासाठी २० लाख कोटी रुपयांचे भरघोस पॅकेज दिले मात्र महाराष्ट्र सरकार डोळे मिटून केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. रेशन वाटपातही राज्य सरकारने पिवळे आणि केशरी रेशनकार्ड करत ढिसाळपणा केला. कोरोनाच्या काळात या रोगाला सामोरे जाताना नागरिकांचे मोठे हाल होत आहे, उपचार करण्यासाठी भटकंती करावी लागत आहे मात्र तरीही हे सरकार निद्रास्त अवस्थेत राहिला आहे. 

लोकांना दिलासा देण्याऐवजी हे तीन पक्षाचे सरकार सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करीत आहे.  कोरोनाच्या लॉक डाउन मध्ये रोजगार नसताना सामान्य ग्राहकाला आलेल्या वाढीव बिलाला महावितरणचे अधिकारी जवाबदार आहेत.शासन सर्व आघाडीवर अपयशी ठरले असताना सामान्या माणसाला वीज बिलाचा हा  शॉक दिला जात आहे. वीज पुरवठा अत्यावश्यक सेवेत येत असल्याने शासन वेगवेगळे गुन्हे दाखल करेल त्यामुळे मुख्य प्रश्न बाजूला राहील म्हणून आज कार्यालयाला टाळे  न लावता प्रतिकात्मक टाळे लावून महावितरणला इशारा दिला असून सामान्य ग्राहकांना न्याय न मिळाल्यास महावितरणच्या प्रत्येक कार्यालयाला टाळे ठोकून अधिकार्‍यांना आत मध्ये कोंडून ठेवण्याचा इशारा ही त्यांनी यावेळी दिला .

यावेळी महापौर  डॉक्टर कविता चौतमोल, भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, शर अध्यक्ष जयंत पगडे , उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सुशील शर्मा यांनीही आपल्या भाषणातून महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला