मुंबई गोवा महामार्गाची चाळण, नवीन रस्त्यावरही खड्डे, सरकारचा लोकांच्या जिवाशी खेळ

काही ठिकाणी हे खड्डे अर्धा फुटापेक्षाही मोठे आहेत. खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे मोटारसायकलस्वारांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत.

    मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पळस्पे ते इंदापुर या ८४ किमी लांबीच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पाच ते सहा वर्षापासून रेंगाळत सुरु आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत बहुतांश ठिकाणी डांबरीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. मात्र आता नविन मार्गावर पावसामुळे पुन्हा एकदा खड्डे पडून रस्त्याची चाळण झाली आहे. त्यामुळे वाहन चालक व प्रवाश्यांना खड्ड्यातुन प्रवास करावा लागत आहे.

    या भागात खड्डे चुकविताना होणार्‍या अपघाती घटनांचे प्रमाण वाढले आहे. तसेच रिफ्लेक्टर व पांढरे पट्टे नसल्याने वाहनचालकांना रात्रीच्या वेळी वाहन चालवितांना अडथळा येतो. गणेशोत्सवासाठी चाकरमानी मोठ्या प्रमाणावर कोकणात जातात, त्यांचे खड्ड्यांमुळे प्रचंड हाल होत आहेत.

    काही ठिकाणी हे खड्डे अर्धा फुटापेक्षाही मोठे आहेत. खड्ड्यात पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे मोटारसायकलस्वारांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. तसेच मोठ्या खड्यांमध्ये वाहन आपटून अपघात होण्याचा धोका वाढला आहे. मागील वर्षी देखिल या रस्त्याची पुरती चाळण झाली होती. या वर्षी काही ठिकाणी रस्ता अजुन सुस्थितीत आहे. परंतू कामाचा निकृष्ठ दर्जा, अवजड वाहने आणि मुसळधार पावसात या रस्त्याचा देखिल टिकाव लागणार नाही आहे.

    त्यामुळे वाहनचालक व प्रवाश्यांना यंदाच्या पावसाळ्यात सुद्धा खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. ठिकठिकाणी गावाजवळ बायपास पूलाचे काम सुरु असून अपुर्ण कामामुळे प्रवाशी व वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे.